आता नागपुरी गेटचा मार्ग पंधरा दिवस बंदच!
चित्रा चौकातील उड्डाणपुलाचे काम लांबले...

* न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाचे पाऊल
* पोलीस प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन
अमरावती / 4 मार्च : शहराच्या गजबजलेल्या चित्रा चौक ते नागपुरी गेट उड्डाणपुलाचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार हे बांधकाम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे गरजेचे आहे. पुलाच्या खांब क्रमांक 22, 23 आणि 24 दरम्यान गर्डर टाकणे आणि छताचे काम सुरू असल्याने या भागातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे असुरक्षित झाला आहे. त्यामुळे 4 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजेपासून ते 18 मार्च 2026 च्या रात्री 8 वाजेपर्यंत या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विकासकामादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये आणि सर्वसामान्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, याकरिता गाडगेनगर वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आपला लेखी अहवाल दिला होता. त्यानुसार टांगा पडाव ते नागपुरी गेट चौकापर्यंत पायदळ जाणार्यांसह सर्व वाहनांना आता अटकाव करण्यात आला आहे. तसेच चित्रा चौकाकडून नागपुरी गेटकडे जाणारी जड वाहने, मालवाहू गाड्या आणि बसगाड्यांनाही शिरकाव करण्यास सक्त मनाई असेल.
वाहनधारकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी केले आहे. यात टांगा पडाव कडून जाणारी वाहने जवाहर गेट आणि सक्करसाथ मार्गे नागपुरी गेटकडे वळवण्यात आली आहेत. तसेच दीपक चौक, चौधरी चौक आणि पिंजारा मशीद मार्गे केवळ दुचाकी आणि छोट्या गाड्यांनाच वाट दिली जाईल. या नियमांचे उल्लंघन करणार्या चालकांवर पोलीस कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे. पुलाचे काम करणार्या चाफेकर कंपनीलाही सुरक्षेचे सर्व नियम पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सावधान: नियम मोडल्यास पोलीस करणार दंड!-पुलाच्या बांधकामासाठी वाहतुकीत करण्यात आलेले हे बदल 18 मार्चपर्यंत लागू राहतील. नागरिक आणि वाहन चालकांनी पोलिसांच्या या आवाहनाला साथ द्यावी. जर कोणी या आदेशाचे उल्लंघन करून बंद असलेल्या मार्गावर गाडी नेली, तर त्यांच्यावर मोटार वाहन कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई केली जाईल.




