जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती संघ अजिंक्य
आरोग्य विभागाच्या क्रिकेट स्पर्धेत

अमरावती /4 मार्च : महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’टेनिस बॉल क्रिकेट सामने-2026’ (वर्ष 8 वे) मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती संघाने विजय मिळविला. अमरावती येथील छत्रीतलाव मैदानावर नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत आरोग्य विभागातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी यांच्या एकूण 12 संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेचा अंतिम सामना जिल्हा सामान्य रुग्णालय,अमरावती आणि अचलपूर महिला व बाल रुग्णालय यांच्यात झाला. स्पर्धेत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे राज डुलगज याने मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाजाचा बहुमान पटकावला. सुशील ओसवाल यांना उत्कृष्ट गोलंदाज, तर अभिजीत निचत यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देण्यात आला. पहिल्या सेमी फायनलमध्ये डॉ. मनिष गोतमारे आणि दुसर्या सेमी फायनलमध्ये स्वप्निल उसरे सामनावीर ठरले.पुरस्कार वितरण सोहळ्याला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. रणजीत राठोड, डॉ. विक्रांत कुळमेथे, अनंतराव पारसकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रमोद निरवणे यांनी खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले की, आरोग्य सेवेतील ताणतणाव दूर करण्यासाठी मैदानी खेळ अत्यंत आवश्यक आहेत.




