बांठिया समितीनुसार जिल्हा परिषद निवडणुका घ्या
शासन वेळकाढूपणा करत असल्याचा बबलू देशमुख यांचा आरोप

अमरावती /24 फेब्रुवारी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बांठिया समितीच्या शिफारशींनुसार तातडीने घेण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली आहे.
50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असलेल्या जागांवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने प्रक्रिया रखडली असली, तरी शासन या परिस्थितीचा गैरफायदा घेत जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असताना उर्वरित 22 जिल्हा परिषदांबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढत असून जनतेचे प्रतिनि धित्वही प्रलंबित राहिले आहे. बांठिया समि तीने दिलेल्या निकषांनुसार राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रिया अडकून पडली आहे. या पार्श्वभूमीवर बबलू देशमुख यांनी शासनावर कडक शब्दांत टीका केली आहे. 50 टक्के आरक्षणाची अट पाळून उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम तात्काळ जाहीर करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटण्यास विलंब होत आहे. लोकशाहीचा गाभा असलेल्या या निवडणुका लांबणीवर टाकणे हे जनहिताचे नसून, शासनाने आता विनाविलंब निर्णय घेऊन निवडणूक प्रक्रिया मार्गी लावावी, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले आहे.
प्रशासनावर ताण आणि जनतेचे नुकसान – निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. लोकप्रतिनिधींच्या अभावामुळे विकासकामांना खीळ बसली असून सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. शासनाने तातडीने बांठिया समितीच्या शिफारशी लागू करून या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा करावा.




