रिफॉर्मच्या अध्यक्षपदी दिवेश अग्रवाल; डॉ.जवादे सचिवपदावर विराजमान
प्रोग्रेसिव्ह पॅनेलसोबत युनिटीची जोरदार लढत

अमरावती /23 फेब्रुवारी : शहराचे वैभव आणि प्रतिष्ठेचा मानबिंदू असलेल्या कॅम्प परिसरातील ’रिफॉर्म क्लब’च्या निवडणुकीत रविवारी लोकशाहीचा जबरदस्त थरार पाहायला मिळाला. अध्यक्षपदी प्रोग्रेसिव्ह पॅनेलचे दिवेश अग्रवाल यांनी दणदणीत विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले, तर सचिव पदावर युनिटी पॅनेलचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश जवादे यांनी बाजी मारली. या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पॅनेलला अध्यक्षपदासह 6 सदस्यांच्या जागा मिळाल्या, तर युनिटी पॅनेलने सचिव पदासह 3 सदस्य निवडून आणले. यामुळे रिफॉर्म क्लबमध्ये आता दोन्ही पॅनेलची ’मिलीजुली सरकार’ स्थापन झाली असून, सर्वांनी मिळून क्लबच्या विकासाचा निर्धार व्यक्त केला आहे.
रविवारी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी रिफॉर्म क्लबची आमसभा पार पडली, ज्यात सर्व सदस्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली. त्यानंतर दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत अत्यंत उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुनील देशमुख यांनी चोख जबाबदारी पार पाडली. एकूण 1045 मतदारांपैकी 685 सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, ज्यामुळे मतदानाची टक्केवारी 65.55 टक्के इतकी नोंदवली गेली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतमोजणीनंतर आज सकाळी 6 वाजता निकालाची घोषणा होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. अध्यक्षपदाच्या लढतीत दिवेश अग्रवाल यांना 370 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय बंड यांना 311 मतांवर समाधान मानावे लागले. सचिव पदासाठी डॉ. राजेश जवादे यांनी 374 मते घेत विजय संपादन केला, त्यांनी प्रोग्रेसिव्ह पॅनेलच्या शरद चुटके (308 मते) यांचा पराभव केला. व्यवस्थापन समितीच्या नऊ जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात होते. यात प्रोग्रेसिव्ह पॅनेलचे नितीन चेंडूलकर (354), डॉ. अश्विनीकुमार देशमुख (352), हेमंत लड्ढा (367), डॉ. संचिता देशमुख (379), सारंग राऊत (425) आणि अनिल विखे (351) यांनी यश मिळवले. दुसरीकडे युनिटी पॅनेलचे राहुल चड्ढा (361), अंगद देशमुख (348) आणि युवा उद्योजक अमन तलडा (350) हे विजयी झाले. या निवडणुकीत सारंग राऊत यांनी सर्वाधिक 425 मते मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.या चुरशीच्या लढतीत प्रोग्रेसिव्ह पॅनेलच्या विजयाचे शिल्पकार म्हणून राजू मुंधडा, अजय अग्रवाल, रोहित राठी, उमेश महेंद्र आणि रवी बागडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. विजयी उमेदवारांनी आपल्या यशाचे श्रेय या मार्गदर्शकांना दिले आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांमध्ये डॉ. अतुल यादगिरे, पुरुषोत्तम बजाज, कैलास गिरोलकर, रमेश असनानी, भरत तसरे, रवी महल्ले, डॉ. राजेश उताणे, महेश केवळरामानी आणि कैलास पडलकर यांचा समावेश आहे. निकालानंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे क्लबच्या सदस्यांनी गुलालाची उधळण करत जंगी स्वागत केले.




