छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकप्रशासनाची गरज

सुशासन व स्वराज्याची ज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी

आ.सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन

अमरावती / 19 फेब्रुवारी – रयतेचे थोर कल्याणकारी राजे , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी शिवजयंती दिनी आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई खोडके व आ. संजय खोडके यांनी शिवटेकडी स्थित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मानवंदना अर्पण केली. तसेच आमदार महोदयांनी सर्व शिवभक्तांना शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शिवजयंती निमित्य शिवटेकडी सजली असल्याने त्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असता आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन शिवप्रेमींचा आनंद द्विगुणित केला. तसेच शिवटेकडी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व अमरावती महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती व्याख्यान कार्यक्रमाला सुद्धा आ.सौ.सुलभाताई खोडके व आ.संजय खोडके यांची उपस्थिती होती.
शिवजयंती निमित्य शिवटेकडीवर उपस्थित शिवप्रेमींना शुभेच्छा देतांना आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी सांगितले कि, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि कार्य समतावादी व न्यायपूर्ण समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आजही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक स्वरूपाचे आहे. शिवराज्यातील अर्थ व्यवस्था, धर्मनिरपेक्ष धोरण, स्त्री-पुरुष समानता, शेती विकासाचे धोरण महत्वाचे असून प्रजा हित व रयतेचे कल्याण साधण्याकरिता महाराजांच्या काळातील राज्यकारभार हेच खरे सुशासन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुसरण करून सर्वानी सुशासन व स्वराज्याची ज्योत सदैव तेवत ठेवण्यासाठी नवा संकल्प व नवीन जाणीव निर्माण करण्याचे आवाहन अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले. यावेळी महिलांचा पारंपरिक पेहराव, बालकांच्या विविध वेशभूषा सुद्धा लक्षवेधी ठरल्या. यावेळी शिवटेकडीवर रयतेच्या राजाला मानवंदना अर्पण करण्यासाठी शिवप्रेमींची बहुसंख्येने उपस्थिती होती.

संबंधित बातम्या

Back to top button