पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

अमरावती/19 फेब्रुवारी : पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून भव्य मिरवणूक काढली. ढोल पथकाच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर विद्यार्थ्यांनी ‘शिव शंभू भेट’ हे नाटक सादर केले. या नाट्यप्रयोगातून शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य स्थापनेतील संघर्ष आणि हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा प्रभावी संदेश देण्यात आला. नाटकाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्याचा आदर्श, न्यायनीती आणि धैर्य यांचा वारसा प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयशदादा पोटे पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत भक्तिभावाने आरतीत सहभागी होत शिवगर्जना केल्या.




