चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजी प्रश्नांच्या सूचना मराठीतच द्या

शिक्षक समितीची परीक्षा परिषदेकडे आक्रमक मागणी

* विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी राज्यभर उमटले पडसाद

अमरावती /18 फेब्रुवारी : राज्य शासनाने पुन्हा सुरू केलेल्या इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नांच्या सूचना केवळ इंग्रजीत न ठेवता, त्या मराठीसह संबंधित माध्यमाच्या भाषेत देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. ग्रामीण भागातील आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील क्लिष्ट सूचना समजणे कठीण जात असल्याने, त्यांच्यावर अन्याय होऊ नये या हेतूने पुणे येथील परीक्षा परिषदेला निवेदन पाठवून तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जाणार्‍या इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा एक मोठा तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील सर्व सूचना केवळ इंग्रजी भाषेतच देण्याचे निर्देश परिषदेने दिले आहेत. या निर्णयामुळे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली असून, या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने रणशिंग फुंकले आहे. शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे आणि राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे आणि आयुक्त महेश चोथे यांना सविस्तर निवेदन धाडले आहे. राज्यातील मराठी शाळांमध्ये सन 2000 पासून इंग्रजी विषय सुरू करण्यात आला, मात्र त्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या मनात भाषेची गोडी निर्माण करणे आणि भीती घालवणे हा होता. इयत्ता पहिली ते चौथीच्या पाठ्यपुस्तकांमध्येही कठीण शब्दांचे अर्थ आणि सूचना मराठीत दिलेल्या असतात. असे असताना शिष्यवृत्ती सारख्या महत्त्वाच्या परीक्षेत अचानक केवळ इंग्रजीत सूचना देणे हे अयोग्य असल्याचे समितीने म्हटले आहे. या मागणीबाबत अधिक माहिती देताना शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले की, यापूर्वी अशा सूचना मराठीत दिल्या जात होत्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न नेमका काय आहे हे समजण्यास मदत होत असे. येत्या 26 एप्रिल रोजी रणरणत्या उन्हात ही परीक्षा होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button