जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची आढावा बैठक

महापौर श्रीचंद तेजवाणी यांचा महानगरपालिका शाळांमध्ये सोलर बसविण्यावर भर

अमरावती /18 फेब्रुवारी : जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीची महत्त्वपूर्ण सभा दुपारी 12.00 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस विविध लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी खासदार बलवंत वानखडे होते. यावेळी आमदार गजानन लवटे, आमदार प्रविण तायडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, परीविक्षाधिन अधिकारी कौशल्या एम., अशासकीय सदस्य मोरेश्वर वानखडे, जिल्हा विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांच्यासह नगरपालिकेचे अध्यक्ष उपस्थित होते. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी देखील सभेला उपस्थित होते. सभेदरम्यान अमरावतीचे नवनिर्वाचित महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी महत्त्वपूर्ण विषय मांडला. अमरावती महानगरपालिका अंतर्गत येणार्‍या सर्व महानगरपालिका शाळांमध्ये सौरऊर्जा प्रणाली बसविण्यासाठी नियोजन विभागाकडून स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
महानगरपालिकेच्या एकूण 63 शाळांपैकी 32 शाळांवर सोलर पॅनेल बसविण्यात आले असून उर्वरित 31 शाळांवर अद्याप सौरऊर्जा प्रकल्प बसविणे बाकी आहे. या उर्वरित शाळांमध्ये सोलर प्रणाली बसविण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा, असे त्यांनी सभेत स्पष्ट केले.
महापौरांनी सांगितले की, सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शाळांच्या वीज खर्चात लक्षणीय बचत होणार असून पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये नूतनीकरणीय ऊर्जेबाबत जागरूकता निर्माण होईल. स्वच्छ आणि हरित अमरावती या संकल्पनेच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. महापौरांनी मांडलेल्या प्रस्तावावर अध्यक्ष खासदार बलवंत वानखडे यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. संबंधित विभागांना प्रस्तावाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक तांत्रिक व आर्थिक बाबींची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button