परीक्षार्थींच्या भविष्याचा खेळखंडोबा थांबवा
खा.अनिल बोंडे यांचे मुख्यमंत्र्यांना तातडीने हस्तक्षेप करण्याचे पत्र

मुंबई / 17 फेब्रुवारी : राज्यातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांच्या भविष्याशी निगडित असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इतर महत्त्वाच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षांचे वेळापत्रक फेब्रुवारी 2026 मध्ये एकाच कालावधीत आल्याने परीक्षार्थींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. रेल्वे, इस्रो, नाशिक महानगरपालिका आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षा एका पाठोपाठ एक असल्याने ’कुठली परीक्षा द्यावी आणि कुठली
सोडावी’ असा मोठा पेच विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक ताण लक्षात घेता, खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या परीक्षांच्या दिनांकांचे तातडीने पुनर्नियोजन करण्याची आणि लांबची परीक्षा केंद्रे बदलण्याची आग्रही मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील महापारेषण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत आयोजित सहाय्यक अभियंता भरती परीक्षेत केंद्र वाटपाचा मोठा सावळा गोंधळ समोर आला आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा 25 तारखेला, इस्रोची 26 तारखेला, नाशिक महानगरपालिकेची 24 व 29 तारखेला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कौशल्य चाचण्या 26 व 27 फेब्रुवारी रोजी आयोजित आहेत. याच दरम्यान 25 ते 27 फेब्रुवारी या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचीही परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे. अनेक उमेदवारांनी सर्वच पदांसाठी अर्ज भरले असून, या वेळापत्रकाच्या संघर्षामुळे त्यांना समान संधीपासून वंचित राहावे लागत आहे.
या तांत्रिक परीक्षेसाठी विश्वासार्ह आणि प्रमाणित डिजिटल केंद्रे वापरणे अपेक्षित असताना, प्रशासनाने काही खाजगी आणि अपुर्या सोयींच्या केंद्रांची निवड केली आहे. विशेषतः विदर्भातील उमेदवारांना त्यांच्या घरापासून 300 ते 400 किलोमीटर दूर खानदेश, कोकण आणि मराठवाडा विभागातील केंद्रे देण्यात आली आहेत. यामुळे गरीब आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर प्रवासाचा खर्च, निवासाची सोय आणि प्रचंड मानसिक तणाव असा तिहेरी भार पडला आहे. पुण्याच्या महानगरपालिका भरतीत असाच घोळ झाला असताना तिथे सुधारणा करण्यात आली होती, मग इथेच असा दुजाभाव का, असा संतप्त सवाल विद्यार्थी विचारत आहेत. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या निवेदनात स्पष्ट केले आहे की, आयबीपीएस संस्थेला आणि संबंधित प्राधिकरणास तातडीने सूचना देऊन परीक्षा केंद्रांचे वाटप जवळच्या जिल्ह्यात करावे. ज्यांना चुकीची आणि लांबची केंद्रे मिळाली आहेत, त्यांची केंद्रे बदलून नवीन सुधारित प्रवेशपत्रे जारी करावीत. गरज पडल्यास परीक्षेची तारीख 15 ते 21 दिवसांनी पुढे ढकलून सर्व प्रक्रिया पारदर्शक करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या पत्राची प्रत मुख्य सचिवांनाही पाठवण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शासन आता काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
असा आहे परीक्षेचा पेच -फेब्रुवारी 2026 मध्ये रेल्वे (25 फेब्रु.), इस्रो (26 फेब्रु.), नाशिक महानगरपालिका (24 व 29 फेब्रु.), जीवन प्राधिकरण (25 ते 27 फेब्रु.) आणि लोकसेवा आयोग (26-27 फेब्रु.) अशा सर्वच मोठ्या परीक्षा एकाच वेळी आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती असून वेळापत्रक बदलण्याची मागणी जोर धरत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण परीक्षा लांबणीवर
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 25 ते 27 फेब्रुवारीची भरती परीक्षा पुढे ढकलली आहे. रेल्वे, इस्रो आणि एमपीएससी परीक्षांच्या कौशल्य चाचण्या एकाच दिवशी असल्याने मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन गुरव यांनी हा निर्णय घेतला. परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.




