शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

दोन दिवसात मेडिकल रिपोर्ट येणार, मुंबईला हलविणार

पुणे /9 फेब्रुवारी  : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला शरद पवार यांच्यावर बारामतीत उपचार करण्यात आले. यानंतर डॉक्टांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांना आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. इथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी शरद पवार यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर डॉ. अभिजीत लोढा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या छातीमध्ये थोडा कफ झाला आहे. त्यांना व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनची गरज नाही. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. पुढील दोन-तीन तासांमध्ये रिपोर्ट येतील. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. अभिजीत लोढा यांनी सांगितले. शरद पवार यांच्या शरीरातील ऑक्सिजन आणि हृदयाचे ठोके स्थिर आहेत. गेल्या काही दिवसात झालेल्या धावपळीमुळे आणि तणावामुळे थकवा आला आहे, असे देखील डॉक्टरांनी सांगितले. थोडसं फिजिकल इक्सजर्शन झाल्यामुळे छातीत कफ झाला आहे. छातीत थोडं कन्झेशन आहे. आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवल्या आहेत. ट्रीटमेंट चालू  आहे. आता प्रकृती एकदम स्थिर आहे. तपासण्यांचा अहवाल आल्यावर आम्हाला उपचारात काही बदल करायचे असतील तर करु. तपासणीचे रिपोर्ट आल्यावर आम्ही काही सांगू शकत नाही. शरद पवार आता रुममध्ये आहेत. आयसीयूत नाहीत’, असंही डॉ. अभिजीत लोढा यांनी स्पष्ट केलं.

रोहित पवार यांची कार्यकर्त्यांना विनंती

आ.रोहित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना महत्त्वाची विनंती केली. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो. आपण अजितबात हॉस्पिटलला येऊ नका. कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत. डॉक्टरांनी सांगितल्या नुसार, शरद पवार यांची तब्येत नॉर्मल आहे. आयसीयूत दाखल नाहीयत. एका प्रायव्हेट रुममध्ये आहेत. आताच मी त्यांच्यासोबत चर्चा करुन आलेलो आहे. त्यामुळे घाबरण्यासारखं किंवा टेन्शन घेण्यासारखं काहीही नाही, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button