मणक्याच्या दुर्मिळ गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया
डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे

अमरावती /6 फेब्रुवारी : डॉ पंजाबराव देशमुख रुग्णालय, मोर्शीरोड, अमरावती येथे 55 वर्षीय महिलेवर मणक्याच्या मानेच्या भागात (उ2-उ3) असलेल्या दुर्मिळ डम्बेल ट्यूमरवर यशस्वी शस्त्रक्रिया महाविद्यालयाचे न्यूरोसर्जन डॉ स्वरूप गांधी यांनी केली.
सदर रुग्णाला डाव्या हात व पायामध्ये कमजोरी, तीव्र वेदना, स्नायूंमध्ये आकडीपणा (स्पॅस्टिसिटी) तसेच रिफ्लेक्सेस वाढलेले असल्याच्या तक्रारी होत्या. एमआरआय तपासणीत मणक्याच्या मज्जारज्जूमध्ये (इंट्राड्यूरल) व मज्जारज्जूबाहेर (एक्स्ट्राड्यूरल) पसरलेली डम्बेल आकाराची गाठ आढळून आली. ही गाठ मज्जासंस्थेच्या आवरणातून बाहेर येऊन मणक्याच्या रक्तवाहिनीस (व्हर्टिब्रल आर्टरी) चिकटलेली होती. तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मणक्याची लॅमिनेक्टॉमी व आंशिक फेसिटेक्टॉमी करून गाठ पूर्णपणे काढून टाकण्यात यश मिळवले. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर आहे. सदर रुग्णाच्या शस्त्रक्रियेचा खर्च शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून मोफत करण्यात आला. या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी न्यूरोसर्जन डॉ. अमोल ढगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शस्त्रक्रिये दरम्यान उत्कृष्ट भूल व्यवस्थापनासाठी रुग्णालयाच्या भूलतज्ञ विभाग प्रमुख डॉ.विजया पाटील व चमुचे सहकार्य लाभले आहे. तसेच रुग्णाची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी व शस्त्रक्रियेचे काटेकोर व्यवस्थापनासाठी रुग्णालयाच्या बधिरीकरण विभाग, परिचारिका व कर्मचारी यांचे महत्वपूर्ण योगदान लाभत आहे. पीडीएमएमसी येथील तज्ञ वैद्यकीय डॉक्टरांच्या उत्कृष्ट कौशल्याने अत्यंत आव्हानात्मक असलेली शस्त्रक्रिया परस्पर समन्वयाने व प्रगत उपचार पद्धतीच्या सहाय्याने यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी देशमुख, संस्थेचे पदाधिकारी व अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ पवन टेकाडे यांनी तज्ञ चमूचे अभिनंदन केले आहे.




