अपघात नेमका कसा घडला?

प्रफुल्ल पटेलांनी दिली माहिती

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात आज बारामतीत निधन झालं. त्यांचं पार्थिव आज रात्री बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर आता परत बारामती रुग्णालयात नेण्यात आलं आहे. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानातून बाहेर पडताना ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्यांनी अपघाताची घटना घडल्यानंतर आपल्याला बारामती विमानतळाहून फोन आला होता. त्यानंतर काय-काय घटनाक्रम घडला, याची सविस्तर माहिती दिली. तसेच अजित पवार यांच्यासोबत रात्री फोनवर बोलणं झालं तेव्हा ते काय म्हणाले होते, या विषयीदेखील प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली.
रात्री अजित दादा म्हणाले, प्रफुल्ल आता भेट होणार नाही –आम्हाला विश्वास होत नाही. आम्ही त्यांच्या पार्थिवला नमन करुन आलो, पण अजूनही विश्वास बसत नाही. कारण काल रात्रीच आठ-साडेआठच्या सुमारास त्यांनी मला फोन केला. आमचं फोनवर बोलणं झालं. ते शेवटी एवढंच म्हणाले की, प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही कारण मी आठ-दहा दिवस बाहेर आहे. भेट होणार नाही असं म्हणाले आणि आज खरंच तसं घडलं आहे, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. दु:खाची गोष्ट आहे की, या घटनेत काही लोकांनी राजकारण आणलं आहे. पण या घटनेत कुठेही राजकारण नाही. जे काही झालं त्याची माहिती चौकशीत समोर येईल.

Back to top button