हॉटेल सुपरवायजरचे अपहरण करुन बेदम मारहाण
रात्री वाद दुसर्या दिवशी जंगलात नेऊन मारहाण

* गाडगे नगर पोलिसांकडून सहा संशयितांचा कसून शोध
अमरावती / 28 जानेवारी – अमरावती येथील कठोरा मार्गावरील पोटे महाविद्यालयाजवळ असलेल्या ’आसरा’ हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी थरारक घटना घडली. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी सहा गुंडांनी हॉटेल पर्यवेक्षक अमित गायनेर (25) याचे दिवसाढवळ्या अपहरण करून शिराळा येथील घनदाट जंगलात नेऊन त्याला मरणासन्न अवस्थेपर्यंत बेदम मारहाण केली.
मंगळवारी रात्री रिक्षा अडवून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान बुधवारी एका भयानक गुन्ह्यात झाले. या संपूर्ण कृत्याचा थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात बंदिस्त झाला असून, अमरावती शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गाडगे नगर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत जखमी अमितची सुटका केली असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक कैलास गिरोळकर यांच्या मालकीच्या आसरा हॉटेलमध्ये अमित गायनेर हा पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहे. मंगळवारी रात्री कर्मचार्यांना घरी सोडून परतत असताना काही मद्यधुंद तरुणांनी अमितची रिक्षा अडवून विनाकारण वाद घातला होता. हा वाद रात्री मिटला असे वाटत असतानाच, बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सहा तरुण दुचाकीवरून हॉटेलवर थडकले. त्यांनी रोखपाल रोहित जाधव याला धमकावून अमितच्या घराचा पत्ता मिळवला. त्यानंतर अमितला त्याच्या राहत्या घरातून ओढत बाहेर काढून प्रथम हॉटेलच्या आवारात आणले गेले. तेथे कमरेच्या पट्ट्याने त्याला निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. इतक्यावरच न थांबता, त्याला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून शिराळा मार्गावरील जंगलात नेण्यात आले. तेथे पुन्हा अमानुष मारहाण करून आरोपी पसार झाले. हॉटेल मालकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिल्याने शोधमोहीम राबवली गेली. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात असलेला अमित जंगलातून कसाबसा रस्त्यावर आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तातडीने उपचारार्थ हलवले. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून शोध सुरू केला आहे.
सीसीटीव्ही चित्रीकरण ठरले मुख्य पुरावा-हॉटेलच्या परिसरात आणि दर्शनी भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात आरोपींचे हे सर्व क्रूर कृत्य स्पष्टपणे टिपले गेले आहे. सहा तरुण अमितला घरातून उचलून आणताना, त्याला पट्ट्याने मारहाण करताना आणि दुचाकीवर बसवून नेतानाचे दृश्य यामध्ये दिसत आहे. या भक्कम पुराव्यामुळे आता गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.




