सुपर स्पेशालिटी रुग्णालयात यशस्वी उपचारांच्या सीमा विस्तारल्या
जिल्ह्यातीलच नव्हे परराज्यातील रुग्णांवर उपचार

* 8 महीन्यात 5 हजारावर शस्त्रक्रिया यशस्वी
अमरावती / 28 जानेवारी – स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे केवळ अमरावती शहर किंवा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता, आता संपूर्ण विदर्भ आणि शेजारील मध्य प्रदेश राज्यातील रुग्णांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे. आधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या या रुग्णालयाने गेल्या आठ महिन्यांत तब्बल 5,484 यशस्वी शस्त्रक्रिया करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
एप्रिल ते 31 डिसेंबर 2025 या अल्प काळात 71,419 रुग्णांनी येथे उपचार घेतले असून, यात गंभीर आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मूत्रपिंड प्रत्यारोपणासारख्या अत्यंत जटील 65 शस्त्रक्रिया येथे यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. रुग्णालयातील अत्याधुनिक यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा आधार यामुळे दरवर्षी रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. 2020-21 मध्ये पंधरा हजारांवर असलेली रुग्णसंख्या आता 77 हजारांच्या पार गेली आहे. येथे हृदयविकार, कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध आहेत. तसेच क्ष-किरण तपासणी, ध्वनीलहरी तपासणी, हृदय आलेख, संगणकीय क्ष-किरण तपासणी आणि रक्त शुद्धीकरण अशा सर्व सुविधा एकाच छताखाली मिळत असल्याने रुग्णांचा ओढा वाढत आहे. शंभर खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात अतिदक्षता विभागाची उत्तम सोय असून, आगामी काळात येथे स्वतंत्र रक्तपेढी सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांनी दिली आहे.
रुग्णसेवेचा चढता आलेख
रुग्णालयातील विश्वासार्हता वाढल्याने गेल्या पाच वर्षांत रुग्णसंख्येत पाच पटीने वाढ झाली आहे. आतापर्यंत 65 रुग्णांचे यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण करून रुग्णालयाने कौतुकास्पद कामगिरी केली असून, शेजारील राज्यातील रुग्णही मोठ्या संख्येने येथे धाव घेत आहेत. उत्तम नियोजन आणि तत्पर सेवा हेच या यशाचे गमक आहे.




