मनपा आयुक्तांचा 325 लेटलतीफ कर्मचार्यांना दणका
पगार कापण्याच्या इशार्याने कर्मचार्यांचे धाबे दणाणले

* वेळेवर न येणार्यांवर आयुक्तांची मोठी कारवाई
* कामाला दांडी मारणार्यांना बजावली नोटीस
अमरावती /27 जानेवारी : महानगर पालिकेच्या कार्यालयात वेळेवर न येणार्या आणि कामात कसूर करणार्या 325 अधिकारी व कर्मचार्यांचे धाबे आता चांगलेच दणाणले आहेत. मंगळवार, 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी अचानक घेतलेल्या आढाव्यात शेकडो कर्मचारी कामावर हजर नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. खुर्च्या रिकाम्या आणि कामाचा पत्ता नाही, अशा कामचुकार कर्मचार्यांना आता आयुक्तांनी चांगलाच धडा शिकवण्याचे ठरवले आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्या या 325 जणांना तातडीने ’कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असून, मंगळवारची त्यांची अनुपस्थिती ’विनावेतन’ का केली जाऊ नये, असा परखड सवाल प्रशासनाने विचारला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या नियम 3 नुसार, प्रत्येक कर्मचार्याने आपली कर्तव्यपरायणता टिकवून ठेवणे आणि शिस्तीचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र, अमरावती महापालिकेत अनेक कर्मचारी या नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या आदेशानुसार, चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांनी सकाळी 9.30 वाजता आणि इतर सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी 9.45 वाजेपर्यंत कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. हजेरी नोंदवण्यासाठी शासनाने ’आधार’ प्रणालीवर आधारित ’फेस अॅप’ (चेहरा ओळखून हजेरी) अनिवार्य केले आहे. तरीही, मंगळवारी तपासणी केली असता इतक्या मोठ्या संख्येने कर्मचार्यांनी आपली हजेरीच नोंदवली नसल्याचे संगणक विभागाच्या अहवालातून समोर आले. सहाय्यक आयुक्त श्रीकांतसिंह चौहान यांच्या स्वाक्षरीने ही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पालिका वर्तुळात मोठी घबराट पसरली असून, इथून पुढे वेळेचे उल्लंघन झाल्यास कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही आयुक्त महोदयांनी दिला आहे. कामाच्या ठिकाणी शिस्त असावी आणि जनतेची कामे वेळेवर व्हावीत, या हेतूने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वसामान्य नागरिकांमधून स्वागत होत आहे.
फेस अॅपमुळे पितळ उघडे!
आतापर्यंत केवळ हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी करून पळ काढणार्या कर्मचार्यांचा पत्ता ’फेस अॅप’मुळे कट झाला आहे. चेहर्यावरून हजेरी घेणार्या या तंत्रज्ञानाने 325 जणांचे खोटेपण पकडून दिले. वेळेवर न येणार्या कर्मचार्यांची आता खैर नाही, कारण खुद्द आयुक्त महोदयांनीच या तंत्रज्ञानाच्या आधारे थेट देखरेख सुरू केली आहे.




