विद्यानिकेतनचा सहा महिन्यांत कायापालट करणार

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची शासकीय विद्यानिकेतनला सदिच्छा भेट

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची ग्वाही

अमरावती /27 जानेवारी – महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. 26 जानेवारी रोजी शासकीय विद्यानिकेतन, अमरावती येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यानिकेतन अंतर्गत असलेल्या वस्तीगृह शाळांची पाहणी करून तेथील शैक्षणिक, निवासी व भौतिक सुविधांचा आढावा घेतला.
शासकीय विद्यानिकेतन ही संस्था 1967 पासून कार्यरत वसतीगृह असून राज्य शासनाच्या अखत्यारितील निवासी शाळा आहे, येथे प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश दिला जातो. या शाळांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मंत्री महोदयांनी यापूर्वी मंत्रालय स्तरावर विविध बैठकांचे आयोजन करून प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी प्रत्यक्ष विद्यानिकेतनला भेट देऊन पाहणी केली. मार्गदर्शन करताना मंत्री भुसे म्हणाले, राज्यातील पाच शासकीय विद्यानिकेतन या महाराष्ट्र शासनाच्या शाळा असून त्यांचे पालकत्व थेट राज्य शासनाकडे आहे. आगामी सहा महिन्यांत विद्यानिकेतनचा सर्वांगीण कायापालट करण्याचे उद्दिष्ट आमच्या डोळ्यांसमोर आहे. या शाळांना पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन व प्रशासन पूर्ण ताकदीने कार्यरत आहे.
या कार्यक्रमास अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप संघवे, शिक्षण उपसंचालक (अमरावती विभाग) निलिमा टाके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. अमरावती प्रिया देशमुख, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मुघल, शिक्षण निरीक्षक मनवर, प्रभारी प्राचार्य तथा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) मानकर, उपशिक्षणाधिकारी इम्रान, माजी प्राचार्य नरेंद्र गायकवाड, अधीक्षक श्रीमती निलिमा सोलंके, प्रभारी गृहप्रमुख दिनेश सोनोने, शिक्षक मोहम्मद आफाक, माजी विद्यार्थी प्रभाकरदादा वाघमारे, गावंडे, निस्ताने तसेच शासकीय विद्यानिकेतन येथील सर्व शिक्षक व कर्मचारी आणि विद्यानिकेतनला सेवा देणारे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button