अमरावतीचे महापौरपद सर्वांसाठी ‘खुले’

आरक्षणाच्या सोडतीत अमरावतीसाठी ’सर्वसाधारण प्रवर्ग’ जाहीर

* सर्व महिला व पुरुष नगरसेवकांना महापौरपदाची संधी

* राजकीय नेत्यांची जोरदार फिल्डिंग सुरु

अमरावती /22 जानेवारी : राज्याची राजधानी मुंबईतील मंत्रालयात आज पार पडलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीने अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लावले जात असताना, अखेर अमरावती महानगरपालिकेचे महापौरपद ’खुला प्रवर्ग सर्वसाधारण’ गटासाठी जाहीर झाले आहे.
रोटेशन पद्धतीमुळे यावेळी महिला आरक्षण येईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती, परंतु खुल्या प्रवर्गाचे आरक्षण निघाल्याने आता मातब्बर पुरुष नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या निर्णयामुळे सत्तास्थापनेसाठी लागणारा 44 हा बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांनी आता कंबर कसली असून, फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण येण्याची चिन्हे आहेत. राज्यात जरी काही पक्ष सत्तेत एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र मित्रपक्षांनी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपकडे सध्या 25 जागा असून त्यांना बहुमतासाठी युवा स्वाभिमानच्या 15, शिंदे सेनेच्या 3, बहुजन समाज पक्षाच्या 3 आणि वंचितच्या एका सदस्याच्या पाठिंब्याची गरज आहे. दुसरीकडे, अवघ्या 15 जागांवर असलेली काँग्रेस ही एमआयएमच्या 12, राष्ट्रवादीच्या 11 आणि ठाकरे सेनेच्या 2 सदस्यांना सोबत घेऊन मोठा चमत्कार घडवण्याच्या प्रयत्नात आहे. या राजकीय पेचप्रसंगात आता लहान पक्ष आणि अपक्ष सदस्यांचे महत्त्व कमालीचे वाढले असून, तेच आता सत्तेचे खरे सूत्रधार ठरणार आहेत. डॉ. देवीसिंह शेखावत यांच्यापासून सुरू झालेला अमरावतीचा हा प्रवास आता नव्या आरक्षणासह कोणत्या वळणावर येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सत्तेचा खेळ आणि गोळाबेरीज

अमरावती महापालिकेत कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सध्या कमालीची चुरस निर्माण झाली आहे. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आता दोन्ही आघाड्या आपल्या सर्वात ताकदवान उमेदवाराला मैदानात उतरवणार आहेत. सध्या सुरू असलेल्या गुप्त हालचाली आणि आकड्यांच्या खेळामुळे अमरावतीचा पुढचा मनपा कारभारी कोण होणार, याचे गुपित अद्याप कायम असून आजच्या निर्णयाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

17 व्या ’महापौराकडे सर्वांचे लक्ष 

अमरावती महापौरपद ’खुला प्रवर्ग सर्वसाधारण’ साठी आरक्षित झाल्याने नवा ट्विस्ट आला आहे. डॉ. देवीसिंह शेखावत ते चेतन गावंडे या 16 महापौरांच्या परंपरेनंतर, आता 17 व्या महापौरपदी कौन विराजमान होईल याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

महापौर पदासाठी आकड्यांच्या गणितापेक्षा राजकीय ’फिल्डिंग’च ठरणार निर्णायक!

अमरावती महानगरपालिकेत महापौर निवडीसाठी ’44’ या जादूई आकड्याची चर्चा असली, तरी सत्तास्थापनेचे खरे गणित पडद्यामागच्या हालचालींवर अवलंबून आहे. ही निवडणूक केवळ आकड्यांची बेरीज नसून ’वेळेचे नियोजन’ आणि ’उपस्थिती’ यांचा खेळ आहे. कायदेशीर तरतुदींनुसार, मतदानाच्या दिवशी विरोधक गैरहजर राहिल्यास किंवा त्यांनी बहिष्कार टाकल्यास बहुमताचा आकडा आपोआप कमी होतो. त्यामुळे कमी संख्याबळ असतानाही अनुकूल ’फ्लोअर मॅनेजमेंट’ आणि कायदेशीर रणनीती वापरून महापौरपद खेचून आणणे शक्य आहे. थोडक्यात, हा आकड्यांच्या खेळापेक्षा राजकीय बुद्धीबळाचा डाव असून, ऐनवेळची उपस्थितीच विजयाचा गुलाल ठरवणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button