बस स्थानकावर आरटीओचा प्रश्नमंजुषा उपक्रम
विजेत्यांना हेल्मेटचे वाटप

अमरावती /22 जानेवारी : रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती यांच्या वतीने नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच अभियानाचा एक भाग म्हणून अमरावती मध्यवर्ती बस स्थानक येथे प्रवाशांसाठी वाहतूक चिन्हे, रस्त्यावरील नियम आणि सुरक्षित वाहनचालन या विषयांवर आधारित रस्ता सुरक्षा चालता बोलता या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रश्नमंजुषा सिरीज तिथे जमलेल्या प्रवाशांना विचारण्यात आली.प्रादेशिक परिवहन कार्यालय व टीटीआर होंडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक दिनेश एकडे, मोटार वाहन निरीक्षक प्रतीक रोडे, अमरावती बस स्थानक प्रमुख के. एम. काळे, अक्षय राठोड, टी.टी.आर. होंडाचे जितेंद्र शर्मा, अजय तिवारी तसेच आरटीओचे जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित अधिकार्यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देत नागरिकांनी नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे, याविषयी मार्गदर्शन केले. प्रश्नमंजुषा कार्यक्रमात प्रवाशांना वाहतूक नियम, रस्त्यावरील चिन्हांचे अर्थ, हेल्मेट व सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व, वेगमर्यादा तसेच अपघात टाळण्यासाठी घ्यावयाच्या खबरदार्या यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. तीन प्रश्नांपैकी किमान दोन प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्या प्रवाशांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात अचलपूर येथील सृष्टी बावणे, यावली शहीद येथील शेख आजम, अमरावतीचे अभिजीत शेट्टी, दर्यापूरचे मंगेश पारिसे, सावळापूर(अचलपूर)चे प्रणव मोकळे, पोरा बंदीचे लखन पवार तसेच वेणी गणेशपूरचे गौरव शिंदे यांचा विशेष सहभाग होता. तसेच बस स्थानकात उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांना वाहतूक चिन्हांची माहिती असलेली पॅम्पलेट वाटप करून विविध नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे प्रवाशांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता वाढून सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतुकीला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित अधिकार्यांनी व्यक्त केला.




