नागपूरमध्ये भरदिवसा तरुणीची निर्घृण हत्या
परिसरात खळबळ, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

नागपूर/21 जानेवारी – नागपूरच्या मानकापूर परिसरात दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गोधनी येथील कलेक्टर कॉलनीमधील राजलक्ष्मी सोसायटीत राहणार्या 23 वर्षीय प्राची खापेकर हिचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आला आहे. सुरुवातीला या घटनेची नोंद आत्महत्येच्या संशयावर करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात प्राची च्या डोक्यावर गंभीर जखमा तसेच गळ्यावर लिगेचर खुणा आढळल्याने हा प्रकार थंड डोक्याने आख लेला खून असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अज्ञात आरोपीने दिवसाच्या वेळी घरात घुसखोरी करून प्राचीवर हल्ला केला. धारदार अथवा जड वस्तूने डोक्यावर वार करून तिची हत्या करण्यात आली आणि नंतर दुपट्ट्याच्या सहाय्याने मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्येचा बनाव करण्यात आला. वारदातीनंतर आरोपी मागील बाजूने फरार झाल्याचा अंदाज आहे. मानकापूर पोलिसांनी मृतकाच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.




