आदिवासी महिलांना मधमाशा पालनाचे प्रशिक्षण
आमझरी येथे ‘मधाचे गाव’ योजनेअंतर्गत

अमरावती /21 जानेवारी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ’मधाचे गाव’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आमझरी येथील स्थानिक आदिवासी महिलांना सातेरी मधमाशा पालनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
साधनसंपत्ती आणि मुबलक फुलोरा असलेल्या या भागात मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे रक्षण करणे, मध व त्यापासून तयार होणार्या उत्पादनांची विक्री व्यवस्था करणे आणि मधुपर्यटनाच्या माध्यमातून गावाला स्वयंपूर्ण बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या 10 गावांमध्ये आमझरीचा समावेश असून,सध्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत.
सद्यस्थितीत गावातील 21 महिलांना प्रशिक्षण दिले जात असून, भविष्यात गावातील प्रत्येक घरातील किमान एका सदस्याला प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये मधमाशांच्या जाती, निसर्गातील आग्या मधमाशांच्या वसाहतींपासून शास्त्रोक्त पद्धतीने मध संकलन, मध उद्योगातील उप-उत्पादने आणि मधुमक्षिका पालनाचे तांत्रिक ज्ञान दिले जात आहे. यासोबतच गावात प्रशिक्षणासह मधपेट्यांचे वाटप, मधुबनाची स्थापना, सामुहिक सुविधा केंद्र आणि माहिती दालनाची निर्मिती करण्यात येत आहे, ज्यामुळे हे गाव मध उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी दिली आहे.




