चिखलदर्यात बिबट्यांची दहशत
फॉरेस्ट पार्क जवळच्या ढाब्यात धुमाकूळ

* सीसीटीव्ही कॅमेर्यात थरार कैद
चिखलदरा /20 जानेवारी : पर्यटननगरी चिखलदर्यात रानटी श्वापदांचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याने नागरिकांच्या जिवाचा थरकाप उडाला असून सोमवारी मध्यरात्री फॉरेस्ट पार्क जवळील दिलदार ढाब्यात दोन बिबट्यांनी थेट शिरकाव करून धुमाकूळ घातला. ही संपूर्ण घटना तेथील छायाचित्रण यंत्रणेत बंदिस्त झाली असून या प्रकारामुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाळीव प्राण्यांची शिकार होण्याचे प्रमाण वाढल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी आक्रमक मागणी आता स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.
चिखलदर्याच्या निसर्गरम्य परिसरात सध्या भीतीचे सावट पसरले आहे. अबोदनगो एस चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार मेळघाटच्या कुशीत असलेल्या या शहरात वन्यजीवांचे दर्शन आता नित्याचेच झाले असले तरी भरवस्तीत बिबट्यांचे येणे चिंतेची बाब ठरत आहे. मध्यरात्रीच्या शांततेत दोन पूर्ण वाढलेले बिबट्ये दिलदार ढाब्याच्या परिसरात शिकारीच्या शोधात मुक्तपणे फिरताना आढळले. सुदैवाने त्या वेळी ढाबा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला तरीही कर्मचार्यांमध्ये भयाचे वातावरण आहे. परिसरातून कुत्रे गायब होण्याच्या घटनांमुळे बिबट्यांच्या शिकारीची भूक आता वस्तीपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट होत आहे. रात्रीच्या वेळी एकट्यादुकट्या माणसाने बाहेर पडणे कठीण झाले असून पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वन विभागाने केवळ पाहणी न करता रात्रीची गस्त वाढवून ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निसर्ग आणि मानवी अस्तित्व यांच्यातील हा संघर्ष वेळीच न थांबल्यास भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




