रेल्वे खाली चिरडून वृद्धाचा मृत्यू

अपघात की घातपात संभ्रम?

अमरावती /20 जानेवारी : स्थानिक अंबा कॉलनी परिसरातील 65 वर्षीय वृद्धाचा नवी अमरावती रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीखाली चिरडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली असून घटनास्थळावरील परिस्थिती पाहता ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत नागरिक आणि नातेवाईकांमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले आहे. खोलापुरी पोलिसांनी तातडीने धाव घेत पंचनामा सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. अकोली मार्गावरील खत्री किराणा दुकानापाशी राहणारे दिलीप एकनाथ टेकाडे हे आज दुपारी घराबाहेर पडले होते. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान नवी अमरावती रेल्वे स्थानकाच्या शेवटच्या टोकावर बुस्ट मालगाडीखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की टेकाडे यांचा अक्षरशः चिराडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या आधी प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच खोल्हापुरी पोलीस ठाण्याचे पथक तेथे दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती हाताळली. परिसरातील नागरिक या घटनेला आत्महत्या मानत असले तरी मृतकाच्या कुटुंबीयांनी मात्र हा घातपात असावा असा संशय व्यक्त केला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आता रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेत आहेत. भरवस्तीतील एका ज्येष्ठ व्यक्तीचा असा करुण अंत झाल्याने अंबा कॉलनी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तपासाचे चक्र वेगाने फिरणार-रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. नातेवाईकांनी घातपाताचा संशय घेतल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलीस आता या मृत्यूमागचे गूढ उकलण्यासाठी आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत असून लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button