चांदूर रेल्वे येथील मुंदडा महाविद्यालयात प्रशासकांचा राडा
कुलूप तोडून कागदपत्रांचा ताबा

* प्राचार्यांचा कारवाईला कडाडून विरोध
चांदूर रेल्वे/20 जानेवारी : स्थानिक स्व. मदनगोपाल मुंदडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रशासकीय नियुक्तीवरून सुरू असलेला जुना वाद सोमवारी दुपारी पुन्हा एकदा विकोपाला गेला. अमरावती येथील उच्च शिक्षण सहसंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार नवनियुक्त प्रशासक डॉ. मनोहर कुंभारे यांनी पोलीस बंदोबस्तात महाविद्यालयाचा ताबा घेतला. यावेळी कार्यालयाची कुलपे तोडून कपाटातील सेवापुस्तिका आणि महत्त्वाचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. या नाट्यमय कारवाईमुळे प्राध्यापक आणि कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासक आणि प्राचार्य यांच्यातील हा संघर्ष आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या महाविद्यालयात अंतर्गत वाद आणि आर्थिक व्यवहारांमधील कथित गैरप्रकारामुळे गोंधळ सुरू आहे. यामुळेच महाराष्ट्र शैक्षणिक संस्था व्यवस्थापन अधिनियम 1976 च्या कलम 4 नुसार शासन स्तरावरून येथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी डॉ. सतीश माळोदे यांनी हे पद सांभाळण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर डॉ. अभय खांबोरकर यांनी डॉ. मनोहर कुंभारे यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी सायंकाळी 5 वाजता डॉ. कुंभारे हे त्यांचे सहकारी प्रा. तपवीन पाटील, अजय भोसले आणि प्रा. माया वानखेडे यांच्यासह महाविद्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी पदभार स्वीकारण्याची तयारी दर्शवली असता प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे यांच्यासोबत त्यांचा जोरदार शाब्दिक वाद झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तातडीने पोलीस कर्मचार्यांना पाचारण करण्यात आले. पोलीस आल्यानंतर प्राचार्य डॉ. कारमोरे आणि इतर काही कर्मचारी तिथून निघून गेले, मात्र कार्यालयातील कपाटांच्या चाव्या उपलब्ध नसल्याने पेच निर्माण झाला. अखेर प्रशासकांनी कुलूप तोडणार्या कारागिराला बोलावून कपाटांच्या बनावट चाव्या तयार केल्या आणि त्यातील 17 सेवापुस्तिकांसह महत्त्वाच्या फाईल्स आपल्या ताब्यात घेतल्या. डॉ. कुंभारे यांनी या कारवाईचे समर्थन करताना सांगितले की, महाविद्यालयातील आर्थिक अनियमितता आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळे ही कडक पावले उचलणे गरजेचे होते. त्यांनी प्रा. माया वानखेडे यांच्याकडे प्राचार्यपदाची धुरा सोपवणार असल्याचे संकेत दिले असून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. दुसरीकडे, प्राचार्य डॉ. कारमोरे यांनी ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आणि नियमांची पायमल्ली करणारी असल्याचे म्हटले आहे. सायंकाळच्या वेळी अशा प्रकारे जबरदस्तीने घुसून कागदपत्रे लंपास करणे हा अन्याय असून, याविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केला असला तरी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही.
कुलूप तोडून कागदपत्रे जप्त-महाविद्यालयातील अंतर्गत संघर्षाने आता टोक गाठले असून, चक्क कार्यालयाची कुलपे तोडून कागदपत्रे बाहेर काढण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पोलीस बंदोबस्तात झालेली ही धाडसी कारवाई जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. प्रशासक आणि प्राचार्य यांच्यातील या कायदेशीर लढाईत आता न्यायालय काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




