…आता मला थांबायचंय

मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आ. संदीप जोशी यांच्या पत्राने खळबळ

नागपूर /19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यांची टर्म मे महिन्यापर्यंत असताना त्यांनी आज भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होत असलेली घुसमट एका पत्रातून स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नुकतीच मनपा निवडणूक आटोपली. यावेळी मोठ्या प्रमाणावर नवोदितांना तिकीट देताना, निष्ठावंतांवर अन्याय झाला इतर पक्षातून आलेल्यांना संधी मिळाली. भाजपात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी जाणवली. यामुळे 120 पार…भाजपला साध्य करता आले नाही. यातूनच अनेक समर्थकांना आपण न्याय देऊ शकलो नाही या भावनेतून तर त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले नाहीत ना, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. आता मला थांबायचे आहे…असे त्यांनी नमूद केलेल्या या पत्रातून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. मुख्यमंत्री परदेशात असताना आमदार संदीप जोशी यांच्या या पत्राला राजकीय महत्त्व आले आहे. हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे. या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व नितीनजी गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे.
हा निर्णय क्षणिक भावनेतून नाही-माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत, अर्थात आमदारकी, 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन.मात्र त्यामागे एक टक्काही नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button