तृतीयपंथी मतदारांसोबत बैठक

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक

शंभर टक्के मतदानाचे आवाहन

अमरावती /14 जानेवारी : अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने मा.आयुक्त तथा निवडणूक अधिकारी महानगरपालिका अमरावती सौम्य शर्मा-चांडक मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील तृतीयपंथी मतदारांची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत तृतीयपंथी समाजातील मतदारांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प व्यक्त केला. बैठकीदरम्यान माननीय अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी तृतीयपंथी मतदारांचे मतदानातील महत्त्व स्पष्ट करताना, निवडणूक प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे नमूद केले. मतदानाचा हक्क बजावताना कोणत्याही अडचणी आल्यास महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक ती मदत देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी उपस्थित तृतीयपंथी मतदारांनी प्रशासनाच्या उपक्रमाचे स्वागत करत, माझे मत, माझा अधिकार या भावनेतून आगामी महानगरपालिका निवडणुकीत शंभर टक्के मतदान करण्याचे आव्हान स्वीकारले. तसेच समाजातील इतर तृतीयपंथी मतदारांनाही मतदानासाठी प्रेरित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीला स्वीप विभागाची प्रमुख तथा शिक्षणाधिकारी महानगरपालिका अमरावती डॉ. प्रकाश मेश्राम, स्वीप सदस्य श्री उज्वल जाधव तसेच महामंडलेश्वर गुड्डी ताई, तृतीयपंथी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या उपक्रमामुळे तृतीयपंथी मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button