तपोवन परिसरात भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
मार्डी मार्गावर ट्रकने दुचाकीला चिरडले

* फ्रेजरपुरा पोलिसांकडून घटनेचा पंचनामा पूर्ण
अमरावती /12 जानेवारी : शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या तपोवन परिसरात सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण धडकेत एका 22 वर्षीय तरुणानं आपला जीव गमावला आहे. अक्षय प्रवीण सोळव (रा. कविता, ता. अचलपूर) असे या दुर्दैवी मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय हा अमरावती येथील मार्डी रोडवरील एका मेडिकल स्टोअरमध्ये कार्यरत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी (12 जानेवारी) सायंकाळी आपले काम संपवून तो दुचाकीने (क्रमांक चक 27 उऊ 0381) आपल्या गावाकडे निघाला होता. दरम्यान, मार्डी ते अमरावती मार्गावरील तपोवन जवळ समोरून येणार्या ट्रकने (क्रमांक चक 27 इद 7052) अक्षयच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक लागल्यानंतर दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत गेली. या गंभीर दुखापतीमुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू केला असून, या घटनेमुळे कविता परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुटुंबावर दुखाचा डोंगर-अचलपूर तालुक्यातील कविता येथील रहिवासी असलेला अक्षय सोळव हा कुटुंबाचा मोठा आधार होता. मेडिकलमध्ये काम करून तो आपल्या भविष्याची स्वप्ने विणत होता. मात्र, कामावरून घराकडे परतत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. एका निष्पाप तरुणाच्या मृत्यूमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.




