वाळू घाटावर व्यावसायिकाचा हवेत गोळीबार

बोरगाव निस्ताने गावातील दहशत माजवणारी टोळी जेरबंद

* मुख्य आरोपीसह तिघांच्या आवळल्या मुसक्या, अवैध कट्टा जप्त

अमरावती /11 जानेवारी : जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या बोरगाव निस्ताने वाळू घाटावर शनिवारी मध्यरात्री गुन्हेगारी वर्चस्वातून गोळीबाराचा थरार घडला.
वाळू उपशाच्या शुल्कावरून (रॉयल्टी) झालेल्या वादाचे पर्यावसान चक्क हवेत गोळीबार करण्यात झाले असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वाळू वाहतूकदार सागर गाढवे याने आपल्या सहकार्‍यांसह घाट व्यवस्थापकावर दबाव निर्माण करण्यासाठी आणि स्वतःची दहशत प्रस्थापित करण्यासाठी बेकायदेशीर देशी कट्ट्यातून गोळी झाडली. याप्रकरणी पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत रविवारी सायंकाळपर्यंत मुख्य आरोपीसह तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, चांदूर रेल्वे येथील सागर गाढवे हा वाळू वाहतुकीचा व्यवसाय करतो. शनिवारी रात्री तो जय ठाकरे, छोटू ऊर्फ रितेश गहूकार आणि सोनू पठाण यांच्यासह चारचाकी वाहनाने बोरगाव निस्ताने घाटावर पोहोचला. यावेळी घाट व्यवस्थापक हेमंत साठे यांच्यासोबत रॉयल्टीच्या दरावरून त्याचा वाद झाला. इतर व्यावसायिकांकडून कमी शुल्क घेतले जाते, मग माझ्याकडून जादा वसुली का, असा पवित्रा घेत सागरने वाद घातला. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले आणि त्याच भरात सागरने स्वतःजवळील अवैध देशी कट्टा काढून हवेत फायर केले. या अनपेक्षित प्रकारामुळे घाटावर एकच खळबळ उडाली. हेमंत साठे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवून सागर गाढवे, छोटू गहूकार आणि सोनू पठाण यांना बेड्या ठोकल्या.
घाटावरील लिलाव प्रक्रियेनंतर वर्चस्व मिळवण्यासाठी वाळू माफिया आता शस्त्रांचा वापर करू लागल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. केवळ शुल्कात सवलत मिळवण्यासाठी थेट गोळीबार करून व्यवस्थापनाला धमकावण्याचा हा प्रकार कायदा सुव्यवस्थेला दिलेले खुले आव्हान आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणार्‍यांचा आता शोध घेतला जात आहे.

Back to top button