राजकारणातून ‘व्हीआयपी संस्कृती’ कायमची हद्दपार करा
माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी मांडले परखड मत

* कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करणार्या पक्षाची अवस्था केविलवाणी
अमरावती । 11 जानेवारी : शहर व ग्रामीणच्या राजकारणातून ’व्हीआयपी संस्कृती’ कायमची हद्दपार करून सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा ठाम निर्धार माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. ’दैनिक आपली मातृभूमी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी शहराच्या सद्यस्थितीवर सडेतोड भाष्य करताना राजकीय व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले.
90 च्या दशकात आम्ही अमरावतीतून बड्या नेत्यांच्या मागे-पुढे फिरण्याची प्रथा मोडीत काढली होती, अशी आठवण गुप्ता यांनी करून दिली. त्यावेळी कार्यकर्त्यांना सन्मान मिळत असे आणि सामान्य जनतेची कामे विनासायास होत असत. मात्र, 1999 नंतर शहरात पुन्हा एकदा ’व्हीआईपी’ संस्कृतीचा उदय झाला आणि आज तर ती ’व्हीव्हीआयपी’ स्तरावर पोहोचली आहे. सध्याच्या राजकीय स्थितीत एका राष्ट्रीय पक्षाला स्थानिक शक्तीसमोर झुकावे लागत आहे, ही शहरासाठी शोकांतिका आहे. जमिनीवरील कार्यकर्त्यांशी नाळ तोडल्यामुळेच त्या पक्षावर ही नामुष्की ओढवली असून ते केवळ बड्या लोकांच्या विळख्यात अडकले आहेत, अशी टीका गुप्ता यांनी केली.
या पार्श्वभूमीवर, अमरावती महानगरपालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेची सत्ता आणणे आवश्यक आहे, कारण हाच एकमेव पक्ष कार्यकर्त्यांना केंद्रस्थानी मानतो. सत्ता परिवर्तन हीच काळाची गरज असून, ज्या पक्षात कार्यकर्त्यांची किंमत नाही, तो पक्ष जनतेला न्याय देऊ शकत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यात विद्यमान लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. शिंदे गटाची शिवसेना ही ’व्हीआयपी’ मुक्त असून ती सर्वसामान्यांसाठी काम करणारी संघटना आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




