अमरावतीत गोडसेवरून ओवैसींचे वादग्रस्त विधान
नथुराम गोडसेबद्दल वापरले अत्यंत आक्षेपार्ह शब्द

* भाजपावर टीका करतांना घसरली जीभ
अमरावती । 11 जानेवारी : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एका जाहीर सभेत नथुराम गोडसेचा उल्लेख करत अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. चांदनी चौक येथील अकॅडमिक मैदानावर झालेल्या सभेत ओवैसी यांनी गोडसेच्या चारित्र्यावर बोट ठेवत भाजपावर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.
भाषणादरम्यान ओवैसी म्हणाले की, भाजपाच्या लोकांचे लक्ष नेहमी माझ्या शेरवानीवर असते, यात त्यांची चूक नाही. कारण ते गोडसेच्या विचारांचे पाईक आहेत आणि गोडसेलाही शेरवानी खूप आवडायची. यावेळी ओवैसी यांनी काही विशिष्ट हावभाव करत गोडसेला ’उधरवाला’ असे संबोधले. इतकेच नाही तर, हैदराबादमध्ये अशा लोकांना ’टिउं’ म्हटले जाते आणि अरबी भाषेत ’लूती’ असे संबोधले जाते, अशी विखारी टीका त्यांनी केली. आपले म्हणणे लोकांना पटवून देण्यासाठी ओवैसी वारंवार समजले की नाही? असा प्रश्न उपस्थित जनसमुदायाला विचारत होते. एका आठवड्यात दुसर्यांदा अमरावती दौर्यावर आलेल्या ओवैसी यांनी थेट गोडसेच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर सभेत उपस्थित नागरिकांमध्ये हशा पिकला असला तरी, राजकीय स्तरावर याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.
मनपाच्या प्रचारात वैयक्तिक टीकेचा खालचा स्तर
खासदार ओवैसी यांनी गोडसेबद्दल वापरलेले ’टिउं’ आणि ’लूती’ हे शब्द अत्यंत अपमानजनक मानले जातात. लोकशाहीत राजकीय विचारधारेवर टीका करण्याऐवजी एखाद्याच्या चारित्र्यावर अशा प्रकारे भाष्य करणे हे निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करणारे ठरू शकते. ओवैसींच्या या विधानामुळे अमरावतीत सामाजिक तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.




