आज मनपाच्या रणसंग्रामात ओवैसींची पुन्हा तोफ धडकणार
बडनेरा आणि अमरावतीमध्ये एकाच दिवशी दोन भव्य जाहीर सभांचे आयोजन

* महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाने लावली संपूर्ण ताकद
अमरावती / 9 जानेवारी : स्थानिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ’ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमिन’ अर्थात एमआयएम पक्षाने आपली सर्व शक्ती पणाला लावली असून पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी एकाच आठवड्यात दुसर्यांदा अमरावती दौर्यावर येत आहेत. शनिवारी 10 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता बडनेरा येथील जुनी वस्ती भागातील अलमास नगर मैदान आणि सायंकाळी सात वाजता अमरावतीतील अकॅडमिक मैदानावर त्यांच्या दोन विराट सभा होणार असून या दौर्यामुळे शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.
अमरावती महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत एमआयएम पक्षाने पहिल्याच प्रयत्नात 10 जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यामध्ये अमरावतीतील 7 आणि बडनेरा येथील 3 जागांचा समावेश होता. या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी आणि जागांची संख्या वाढवण्यासाठी खासदार ओवैसी स्वतः मैदानात उतरले आहेत. गेल्या रविवारी 4 जानेवारी रोजी त्यांनी शहरात सभा घेऊन लवकरच परत येण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अवघ्या सात दिवसांत ते पुन्हा अमरावतीकरांच्या भेटीला येत आहेत. या निवडणुकीत पक्ष अत्यंत गंभीर असून शहरात आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या दौर्यादरम्यान खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या निशाण्यावर कोण असेल, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः भाजप नेते खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी ओवैसी यांच्या विधानांवरून घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर आता ओवैसी काय प्रत्युत्तर देतात, याची उत्सुकता वाढली आहे. खासदार ओवैसी यांच्या पाठोपाठ त्यांचे धाकटे बंधू आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचाही दौरा नियोजित असल्याने शहरात एमआयएमच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.
ओवैसी विरुद्ध बोंडे संघर्ष पेटणार?
माजी खासदार नवनीत राणा यांच्यासोबतची शाब्दिक चकमक सर्वश्रुत असतानाच, आता भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी ’मुस्लिम महापौर’ या मुद्द्यावरून ओवैसींना आव्हान दिले आहे. त्यामुळे यावेळच्या सभेत खासदार ओवैसी आपल्या भाषणातून डॉक्टर बोंडे यांच्यावर कोणता प्रहार करतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे डोळे लागले आहेत.




