जवाहर स्टेडियम प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला बळकटी देण्यासाठी कटीबद्ध

आ.सुलभा खोडके यांचे प्रतिपादन

* रामपुरी कॅम्प प्रचार कार्यालयाचे उदघाटन

अमरावती/6 जानेवारी – अमरावती मनपा क्षेत्रातील जवाहर स्टेडियम हा प्रभाग एक सुशिक्षित व उच्चभ्रू असा प्रभाग म्हणून ओळखला जातो. श्रमिक वर्गाबरोबरच व्यापारीवर्ग, नोकरदार तसेच मध्यमवर्गीय लोकांचा प्रभाग असल्याने प्रभागातील समस्या सुद्धा वेगवेगळ्या आहे. प्रभागात पायाभूत विकासाला बळकटी देत असतांना समाजाचे आर्थिक , सामाजिक व न्यायोचित प्रश्न सोडविणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ विकासाला गती देणारी नसून आपल्या माणसांना बळ व ताकद देणारी आहे. गेल्या काही वर्षभरापासून प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलत असतांना सामाजिक विकासातून समृद्धीकडे वाटचाल करायची आहे. त्यासाठी सर्वानी मोठ्या जिद्दीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मजबुती प्रदान करण्याचे आवाहन अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले.
अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक – 7 जवाहर स्टेडियम मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार – रेखाताई भुषण बनसोड ,मनीष बजाज, अंजली महल्ले ,मोहित भोजवानी यांच्या मांगीलाल प्लॉट व रामपुरी कॅम्प येथील प्रचार कार्यालयाचा उदघाटन कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटन महासचिव – आ.संजय खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष (ग्रामीण )संतोष महात्मे, यश खोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष माजी नगरसेवक – भुषण बनसोड, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार महोदयांच्या हस्ते फित कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक सहकारी व पदाधिकार्‍यांच्यावतीने आमदार महोदयांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी आ.सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की , अमरावती शहरात विकासाचे पर्व नांदत असतांना आमच्याही प्रभागात जनविकासाच्या सर्व सुविधा असल्या पाहिजे , या भावनेने स्थानिक सहकारी हे धडपडत असतात. त्यामुळेच आम्ही अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभागाच्या समस्यांची जाण असणारे व त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी धडपड करणारे सर्वसमावेशक चेहरे उभे केले आहेत. प्रभागामध्ये उर्वरीत कामे करून विकासाला गती व बळ द्यायच आहे, नागरिकांना अभिप्रेत लाभ द्यायचा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचे आवाहन आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले आहे. याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन महासचिव आ.संजय खोडके यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले कि, अमरावती शहर हे विभागाचे मुख्यालय आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या आरोग्य यंत्रणा, शासकीय कार्यालये , सामाजिक , शैक्षणिक व क्रीडा सुविधा या जुन्या झाल्या असून मोडकळीस आल्या होत्या. त्यामुळे विकासाला गती देऊन या सर्व शासकीय यंत्रणा पुन्हा उभ्या करणे आवश्यक असल्याने शासनाकडे पाठपुरावा करून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. याची फलश्रुती म्हणून जिल्हा स्त्री रुग्णालय येथे 400 खाटांची नूतन इमारत कार्यान्वित झाली असून , सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे किडनी , कॅन्सर , मेंदूरोग , हृदयरोग उपचार युनिट सुरु करून आता फेज-तीन चे नियोजन सुरु आहे. इर्विनची नूतन इमारत साकारण्यात येत आहे. विभागीय क्रीडा संकुल येथील क्रीडा सेवांचा विस्तार होत असून राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा प्रशिक्षण व स्पर्धांची सोय झाली आहे. या सर्व यंत्रणा जवाहर स्टेडियम प्रभागात असल्याने स्थानिक नागरिकांना त्याचा भरपूर लाभ घेणे सुविधाजनक आहे. केवळ रस्ते , नाली , साफसफाई असा विकास करणे हेच जनप्रतिनिधींचे काम नसून आरोग्य , शिक्षण , उद्योग व रोजगार अशा विषयांना योग्यपणे हाताळून जनतेच्या जीवनात नवा बदल घडविणे महत्वाचे आहे. अशा शब्दात आ. संजय खोडके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करून स्थानिक भागातील समस्याविषयी उपस्थितांना अवगत केले. राज्यात सरकारमध्ये राहून राष्ट्रवादीने जनहिताचे निर्णय घेतले असल्याने दोन्ही आमदारांनी अमरावतीचा कायापालट केला. त्यामुळे आता आमची साथ -विकासाला व घड्याळाला असल्याचा एकसूर स्थानिक नागरिकांमध्ये उमटला होता. यावेळी प्रभाग क्रमांक – 7 जवाहर स्टेडियम अंतर्गत रामपुरी कॅम्प , कृष्णानगर , सिद्धार्थ नगर ,भीमनगर , मांगीलाल प्लॉट , श्रीकृष्ण पेठ , कॅम्प परिसर , आदी भागातील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button