अमरावतीत 29 लाखांचा गुटखा जप्त

ट्रान्सपोर्ट नगरातील तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त

* मनपा निवडणुकीच्या पोर्शभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई
* मध्यप्रदेशातून आलेला सुगंधी तंबाखूचा साठा पकडला
* शहर पोलिसांकडून सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल, दोन आरोपी अटकेत

अमरावती /6 जानेवारी : मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अवैध व्यवसायांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत आज मंगळावर 6 जानेवारी रोजी गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून वलगाव रोडवरील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात एक मोठी कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, इंदौर येथून एका आयसर ट्रकमध्ये छुप्या पद्धतीने प्रतिबंधित गुटखा अमरावतीत आणला जात आहे. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे आणि त्यांच्या पथकाने ट्रान्सपोर्ट नगर येथील शिवभोजन थाळीच्या बाजूला असलेल्या डायमंड ट्रान्सपोर्टवर छापा टाकला. यावेळी तेथे उभा असलेला एम.एच.15/ईई/ 1877 क्रमांकाचा आयसर ट्रक संशयास्पद रित्या आढळला. पोलिसांनी या ट्रकची झडती घेतली असता, त्यात सर्वसाधारण मालाच्या आड लपवून ठेवलेला शासनाने प्रतिबंधित केलेला रजनीगंधा, बाबा गोल्ड, गोल्ड अहमदाबाद आणि रिमझीम असा मोठ्या प्रमाणातील सुगंधी तंबाखू व गुटखा मिळून आला. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घनश्याम दंदे यांना घटनास्थळी पाचारण करून या मालाची पंचासमक्ष पाहणी करण्यात आली. या कारवाईत 14 लाख 43 हजार 620 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणि 15 लाख रुपये किमतीचा आयसर ट्रक असा एकूण 29 लाख 43 हजार 620 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी ट्रक चालक ईश्वर भगवानसिंग सूर्यवंशी (रा. इंदौर) आणि ट्रान्सपोर्ट मालक अब्दुल सलीम अब्दुल कादर (रा. अमरावती) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास केला असता, हा माल इंदौर येथील लॉजिस्टिक मालक अवध किशोर पांडे याने पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हा साठा विक्रीसाठी मागवणारे अमरावती जिल्ह्यातील माउली येथील दानिश, नेर येथील साजीद आणि यवतमाळचा साईराम या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध नागपुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण रॅकेटचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ, सहायक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेच्या पथकाने आणि अन्न सुरक्षा पथकाने बजावली आहे.
अमरावती शहरात निवडणुकीच्या काळात अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांनी 29 लाख 43 हजार 620 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडला आहे. इंदौरहून आलेला हा माल जप्त करून 6 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अमरावती पोलिसांनी तस्करीचे हे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button