नवसारी प्रभागात पुरोगामी विचार व धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा मोठा जनाधार

आ.सुलभा खोडके यांचे प्रतिपादन

* राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उदघाटन

अमरावती /5 जानेवारी : नवसारी प्रभाग म्हटला तर सर्वसमावेशक जनता व पुरोगामी विचार व धर्मनिरपेक्ष विचारधारा मानणारा मोठा जनाधार आहे. या प्रभागात समाजहिताचे प्रश्न व मानवविकासाला केंद्र बिंदू मानून मागील अनेक वर्षांपासून जनसेवेचे व्रत बाळगून सातत्याने विकासात्मक कामे व सामाजिक कार्य सुरु असतांना नेहमीच जनतेचे सहकार्य , विश्वास व आशीर्वाद लाभले आहेत. या भागात सर्वांगीण विकासाला बळकटी देण्यासाठी स्थानिक उमेदवारांनी केलेली धडपड सुद्धा उल्लेखनिय असून त्यांना पाठबळ देणे महत्वाचे आहे. आपल्या माणसांची साथ व विश्वास महत्वाची असून सर्वांना सोबत घेतल्यास विकासाला अधिक गती व बळकटी मिळते. म्हणून आगामी काळातही नवसारी प्रभागात विकासाचे पर्व नांदण्यासाठी आपले आशीर्वाद हीच काम करण्याची ऊर्जा असल्याचे प्रतिपादन आ.सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी केले.
अमरावती महानगर पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक- 3 नवसारी मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवारांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उदघाटन सोहळा कठोरा नाका स्थित थीम पार्क येथे मोठ्या राष्ट्रवादीमय वातावरणात संपन्न झाला. अपघातात दुखापतीनंतर तब्बल 15 दिवसांनी मोठ्या मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन महासचिव आ.संजय खोडके यांचे प्रथमच उपस्थिती ही लक्षवेधी व सर्वांमध्ये नवा जोश व उत्साह निर्माण करणारी ठरली. यावेळी श्री. यश खोडके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार – प्रशांत डवरे , संकेत महल्ले,सौ.प्रिया धनाडे, परवीन बानो मोहम्मद फारुख (मंडपवाले ), त्याचबरोबर माजी -नगरसेविका स्वाती जावरे, चित्राताई महल्ले, जेष्ठ नागरीक मंडळाचे अध्यक्ष – पुरुषोत्तमजी गावंडे, सहकार क्षेत्रातील नरेशजी पाटील, मातोश्री वृद्धाश्रमचे सुखदेवराव राऊत, गणेशराव गाले, वासुदेवराव तायवाडे, सुरेश शिरभाते, प्रताप देशमुख, सुनिलजी जावरे, हाजी मसूद साहब, खालिद मास्टर, विश्वनाथजी सदांशिवे, विलासराव चर्जन, सुभाषराव गावंडे, दयाराम तायडे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या हस्ते नवसारी प्रभागाच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. पुढे बोलतांना आ.सुलभाताई खोडके म्हणाल्या कि, आपल्या मागील पंचवार्षिक काळात अमरावतीच्या शाश्वत विकासाला बळकटी मिळत असतांना नवसारी प्रभागात सुद्धा पायाभूत सुविधांची कामे प्रभावीपणे करण्यात आली. प्रभागाचा वाढता विस्तार लक्षात घेता, सुसज्ज रस्ते, नालीचे बांधकाम , चेनलिंग फेन्सिंग , सौंदर्यीकरण, चौकांचे सुशोभीकरण यासह मानवविकासाचे प्रश्न सुद्धा मार्गी लावण्यासाठी विशेषत्वाने पुढाकार घेतला आहे. आता प्रभागाच्या उर्वरित भागात सुद्धा विकासाचे नियोजन करून गती देण्यासाठी एक कृती कार्यक्रम राबविण्यास प्राधान्य असून विकास पर्व अबाधित राखण्यासाठी सर्वानी मिळून सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असून मनपाची निवडणूक एक चांगली संधी असल्याने या संधीचे सोनं करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी मोठ्या ताकतीने उभे राहण्याचे आवाहन सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी केले. दरम्यान मिशन अमरावती महानगर पालिका-2026 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनामाचे विमोचन सुद्धा आमदार महोदयांच्या हस्ते संपन्न होताच उपस्थितांमध्ये जाहीरनाम्याचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी आपल्या संबोधनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तसेच नवसारी प्रभागातील ड सर्वसाधारण गटातील उमेदवार प्रशांत डवरे यांनी सांगितले कि, अमरावती शहराला नवा आयाम , नवे स्वरूप व वैभव प्राप्त करून देण्यासाठी, गतिमान अमरावतीचे ध्येय बाळगून दोन्ही आमदारांनी नवसारी प्रभागाच्या विकासासाठी भरघोस निधी दिला असल्याने कोट्यवधींची विकास कामे मार्गी लागली. अमरावती शहराला वर्ष 2055 पर्यंत नियमित व मुबलक पाणी पुरवठासाठी 1 हजार कोटींची अमृत -2 योजना वरदान ठरली असून वाढत्या शहरीकरणासाठी मोठी कामगिरी आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या माध्यमातून झाली आहे. राष्ट्रवादीला बळ म्हणजेच विकासाला साथ असल्याने नवसारी प्रभागात सुद्धा विकासाचा भगीरथ आणण्यासाठी सर्वानी याचे शिलेदार होण्याचे आवाहन प्रशांत डवरे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व सहकारी व स्थानिक नागरिकांनी वारे घड्याळ… आली रे. घड्याळ अशा घोषणा करताच संपूर्ण परिसर दणाणून गेला. कार्यक्रामाचे सूत्रसंचालन – संदीप जुनघरे व आभार प्रदर्शन शोभनाताई देशमुख यांनी केले.

संबंधित बातम्या

Back to top button