नगराध्यक्ष पदभाराआधीच अग्निशमन दलात उतरले!
झोपडपट्टीत भीषण आग विझवण्याची शेख अब्दुल यांची धडपड

आगीत घरगुती साहित्य जळून खाक, जीवित हानी नाही
चिखलदरा /4 जानेवारी – शहरातील झोपडपट्टीत अचानक लागलेल्या भीषण आगीच्या वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच प्रजासत्ताक जबाबदारीची जाणीव दाखवत थेट घटनास्थळी धाव घेतली. प्रभाग क्रमांक तीनमधील आगीला त्यांनी स्वतः अग्निशमन वाहन चालवून आणि नागरिकांसोबत हातभार लावून ताबा मिळवला, ज्यामुळे मोठ्या जीवितहानीचा धोका टळला.
शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अचानक झोपडपट्टीत आग लागल्याचे चित्र भयावह होते. वार्यामुळे आगीचे पसरते वारे झोपड्या झोडत चालले, नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पळत होते, मात्र प्रशासनाची तयारी या गंभीर प्रसंगात अपुरी पडल्याचे उघड झाले. या संकटमोचक क्षणी नगराध्यक्ष शेख अब्दुल यांनी कोणतीही औपचारिकता न करता थेट आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि प्रत्यक्ष सहभागामुळे आगीवर जलद ताबा मिळाला. प्रवीण सरवान यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे, परंतु व्यक्तींच्या जीवितहानीचा धोका टळला.घटनेची माहिती मिळताच नगरसेवक शेख नासिर, शैलेश पाल आणि रूपेश चौबे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती पाहणी केली. त्यांनी पीडित कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी अग्निशमन वाहन चालक छगन तसेच नगरपालिका कर्मचारी शेख फारूक यांनीही धैर्य दाखवून आगीवर नियंत्रण मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली.स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्षाच्या तत्परतेचे कौतुक केले, तरी नगराध्यक्ष आले नसते तर परिस्थिती किती भयंकर झाली असती? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे चिखलदरा नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेच्या अपुर्या सुविधांवर आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरात कायमस्वरूपी, सुसज्ज आणि सक्षम अग्निशमन यंत्रणा उभारण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आग विझवण्यात यश मिळाले असले तरी, भविष्यात अशा घटनांमध्ये नागरिकांचे प्राण आणि मालमत्ता सुरक्षित राहावीत यासाठी प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याचा हा इशारा मानला जात आहे.




