स्व.सुनीता पाटील स्मृती प्रतिष्ठानचे कार्य सर्वत्र पोहचणार

संजिता महापात्र यांचे प्रतिपादन

* प्रेरणादायी उपक्रम : जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्यांची भेट

अमरावती /31 डिसेंबर : स्व. सुनीता पाटील यांचे शैक्षणिक योगदान व स्मृती कायम रहावे, याकरिता ’स्व. सुनीता पाटील मेमोरियल फाऊंडेशन’ द्वारा जिल्ह्यातील 24 शाळांतील मुख्याध्यापकांना विविध शाळापयोगी साहित्य भेट देण्यात आले. दिनांक 30 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी शिल्पा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, शिक्षणाधिकारी सतीश मुगल, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावतीचे अधिव्याख्याता डॉ. दीपक चांदूरे, गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ व संदीप बोडखे, माजी उपशिक्षणाधिकारी पंडित पंडागळें आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात संजिता महापात्र यांनी स्व. सुनीता पाटील मेमोरियल फाऊंडेशनचे किरण पाटील, डॉ. तनुश्री पाटील यांचे विशेषत्वाने कौतुक करत जिल्ह्यातील प्रत्येक शाळांपर्यंत प्रतिष्ठानचे कार्य पोहचण्यासाठी अनेकांनी अश्या प्रकारच्या सामाजिक कार्यात पुढे येणे गरजेचे असल्याचे म्हटले. प्रतिष्ठानचे हे कार्य निरंतर चालू राहील व प्रत्येक शाळांवर स्व. सुनीता पाटील यांच्या स्मृती जपल्या जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जोडीदाराच्या मृत्यूनंतर किरण पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी किरण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमांचे संचालन केंद्रप्रमुख सुभाष सहारे यांनी केले. प्रास्तविक डॉ. तनुश्री पाटील यांनी केले. आभार गजानन चौधरी यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील विविध मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शाळांना साहित्य भेट : -भातकुली तालुक्यातील निंभा, परलाम, मार्की, साहूर, चिखलदरा तालुक्यातील कन्हेरी, गडगाभांडुम, काजलडोह, चांदुर रेल्वे तालुक्यातील तरोडा, दहीगाव धावडे, आमला, धनोडी, जळका जगताप, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टाकळी, रोहणा,दर्यापूर तालुक्यातील नालवाडा, साईनगर, धामणगाव रेल्वे तालुकातील सावळा, शेंदुर्जना खुर्द, अमरावती मधील अंतोरा, अंजनगाव सुर्जी मधील कारला, धारणी तालुक्यातील चिखलढाणा, मोर्शीमधील चिखलसावंगी, वरूड मधील शहापूर आदींना यावेळी साहित्य भेट देण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button