विद्यार्थ्यांनो ! आपल्या नवकल्पानांना प्रत्यक्षात उतरवा
कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांचे प्रतिपादन

* विद्यापीठात ‘आविष्कार’ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
अमरावती /30 डिसेंबर : संशोधनासाठी अनेक क्षेत्रे खुली आहेत. विद्याथ्र्यांनी आपल्या मनातील नवकल्पनांना केवळ विचारांपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. ’अविष्कार’ स्पर्धा हे अशा सर्जनशील विचारांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. विद्याथ्र्यांनी आपले संशोधन समाजासाठी उपयुक्त कसे ठरेल, याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जी. एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील अविष्कार सेल तर्फे आयोजित विद्यापीठ स्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. अविष्कार स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा करुन डॉ. विनायक देशपांडे पुढे म्हणाले, तत्कालीन कुलपती कृष्णा यांनी ही स्पर्धा महाराष्ट्रात सुरू केली आणि त्यानंतर या उपक्रमाला मिळालेली गती यामुळे महाराष्ट्रातील विद्याथ्र्यांच्या कल्पकतेला मोठी चालना मिळाली आहे. आजच्या तरुणांकडे संशोधनात्मक कल्पनांची कमतरता नाही, गरज आहे ती कठोर परिश्रमांची आणि सातत्याची. संशोधन हे केवळ पीएच.डी. मिळवण्यापुरते मर्यादित नसावे, तर त्यातून दर्जेदार जीवन जगण्यासाठी मार्ग सुकर व्हावा, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी एलन मस्क यांच्या यशाचे उदाहरण देतांना सूक्ष्म निरीक्षण आणि समाजाच्या गरजा ओळखून संशोधन करण्याचे आवाहन केले. तसेच बिहारमधील मोहम्मद सैदुल्ला यांनी नदी ओलांडण्यासाठी तयार केलेल्या ’पाण्यावर चालणा-या सायकल’चा दाखला देत, गरज हीच संशोधनाची जननी असल्याचे स्पष्ट केले.एरोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बाबत बोलताना ते म्हणाले की, तंत्रज्ञान मानवाची जागा घेऊ शकत नाही, परंतु ते मानवी कामे अधिक सुलभ करते. विद्याथ्र्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग करावेत. कार्यक्रमात डॉ. प्रवीण उपरे यांनी दक्षिण कोरियातून ऑनलाइन माध्यमातून विद्याथ्र्यांशी संवाद साधला. त्यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे ’संशोधन विषयाची निवड’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कोअर नॉलेज आणि लॅब स्किल्स : संशोधनासाठी मूलभूत ज्ञान आणि प्रयोगशाळेतील कौशल्ये किती महत्त्वाची आहेत, हे त्यांनी पटवून दिले. विद्याथ्र्यांनी स्वतःमधील कौशल्ये ओळखून, समाजाला फायदेशीर ठरेल अशा विषयांत करिअर करावे, असा सल्ला त्यांनी दिला. केवळ संशोधन करून चालणार नाही, तर ते जगासमोर मांडण्यासाठी उत्तम संवाद कौशल्य विकसित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.




