काँग्रेस व राष्ट्रवादीकडून ए-बी फॉर्मचे वाटप
शिवसेना उबाठाचे व बसपाचे अनेक उमेदवार जाहीर

अनेक उमेदवारांनी ए-बी फॉर्मसह दाखल केले अर्ज
अमरावती /29 डिसेंबर – आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना उबाठा आणि बहुजन समाज पक्षाने अनेक जागांसाठी आपले उमेदवार निश्चित केले आहेत.
परिणामी, या दोन्ही पक्षांनी जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांनी आज सोमवारी त्यांच्या पक्षाच्या ए-बी फॉर्मसह अर्ज सादर केले आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेस व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आपले उमेदवार निश्चित केले असून त्यांना ए-बी फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, दोन्ही पक्षांच्या अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरुवात केली आहे.
अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुरू झाली होती आणि ती उद्या, मंगळवार, 30 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदत संपत आहे. तथापि, नामांकन प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असूनही, इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने तसेच जागा वाटपाचा तिढा कायम असल्याने बंडखोरीच्या भितीमुळे प्रमुख राजकीय पक्षांनी अद्याप त्यांच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांच्या नावांबाबत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बहुजन समाज पक्ष आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने यांनी विविध प्रभागांसाठी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादरम्यान, काँग्रेस आणि अजित पवार गटाकडून सोमवारी त्यांच्या उमेदवारांची काही नावे निश्चित करुन उमेदवारांसाठी ए-बी फॉर्म वाटप सुरु केले आहे. दरम्यान, भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युती करायची की नाही आणि जागावाटपाबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.




