नागपुरात ‘आयात’ उमेदवारांवरून भाजपचा गड हादरला

चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरही मांडल्या व्यथा

नागपूर /29 डिसेंबर : नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना अजूनही कोणत्याही प्रमुख पक्षाने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केलेली नाही.
एकीकडे 151 जागांसाठी निवडणूक होणार असताना भारतीय जनता पक्षाकडे तब्बल 4 हजारांहून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे उमेदवारीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला असून, त्याचे पडसाद आता थेट रस्त्यावर उमटताना दिसत आहेत.
उमेदवारी नाकारली जात असल्याने भाजपमधील अनेक जुने, निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या नाराजीचा उद्रेक मंगळवारी नागपूरमध्ये पाहायला मिळाला. नाराज कार्यकर्त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन आपली व्यथा मांडली. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या, विशेषतः काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकार्‍यांना उमेदवारी दिली जात आहे, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. विशेषतः प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारीवरून असंतोष अधिक तीव्र झाला आहे. या प्रभागातील दोन महिला जागांसाठी नुकत्याच भाजपमध्ये दाखल झालेल्या दोन महिलांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा समोर येताच स्थानिक कार्यकर्त्यांचा संयम सुटला. प्रभाग 15 मधील अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन गडकरी यांच्या निवासस्थानी जमले होते. याचवेळी तेथून निघत असलेल्या भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना कार्यकर्त्यांनी थेट जाब विचारला.जर प्रभागाच्या बाहेरच्या लोकांनाच उमेदवारी दिली जाणार असेल, तर गेल्या 20-30 वर्षांपासून पक्षासाठी काम करणार्‍या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करायचं? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

संबंधित बातम्या

Back to top button