आज अमरावतीत महायुतीवर पुन्हा निर्णायक बैठक
भाजप, शिंदे शिवसेना, युवा स्वाभिमानमध्ये बैठकावर बैठका

* नागपुरातील चर्चा निष्फळ, जागा वाटपावर रस्सीखेच
अमरावती /25 डिसेंबर : आगामी अमरावती महापालिका निवडणुकीत महायुती लढवण्याच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पार्टी युतीसाठी गुरुवारी नागपुरात चार तास चाललेल्या चर्चेचा निकाल अजूनही अर्धवट आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप युती करण्यास तयार आहे, पण शिंदे शिवसेनेला 15 जागा आणि युवा स्वाभिमान पक्षाला 8 जागा देण्याबाबत ठाम असल्यामुळे अंतिम निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार चर्चा आणि बैठका सुरु होत्या. परंतु कोणत्याही पक्षाने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतलेली नव्हती. गुरुवारी नागपुरात झालेल्या बैठकीत भाजपाचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या कोअर कमिटीचे स्थानिक पदाधिकारी, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार सहभागी झाले. या बैठकीत महायुतीत लढवण्यासाठी जागा वाटपावर चर्चा झाली, परंतु भाजपने ठाम राहून सांगितले की जागा जास्त देणे शक्य नाही.
भाजप, शिवसेना आणि युवा स्वाभिमान पक्ष युती करणार आहेत, हे आजच्या चर्चेत स्पष्ट झाले असले, तरी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे अजून निश्चित नाही. नागपुरातील चार तास चाललेल्या बैठकीत काही ठोस निष्कर्ष न निघाल्याने, नागपुरातील चर्चा अमरावतीत पुढे नेण्याचे ठरले आहे. यामुळे आज शुक्रवारी अमरावतीत कोअर कमिटीची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, याचा फॉर्म्युला ठरवला जाण्याची अपेक्षा आहे. भाजपाच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा, अनिल बोंडे, संजय कुटे, प्रवीण पोटे, शिवराय कुळकर्णी, किरण पातूरकर, जयंत डेहणकर यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाकडून जगदीश गुप्ता, संतोष बद्रे, प्रिती बंड, ज्ञानेश्वर धाने पाटील आणि युवा स्वाभिमान पक्षाकडून आ.रवी राणा यांच्यासह वरिष्ठ नेते सहभागी झाले.
एकीकडे महायुतीसाठी युती निश्चित होत असली तरी, प्रत्येक पक्षाने उमेदवारांच्या अर्जांचे वाटप केले आहे. हजारो अर्जदारांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले असून, प्रत्येक अर्जदाराची अपेक्षा आणि आशा शिखरावर पोहचली आहे. त्यामुळे जागा वाटपाचे अंतिम निर्णय कोणत्या दिशेने जाणार हे येणारी वेळच ठरवेल.
या पार्श्वभूमीवर, अमरावती महापालिकेत महायुती म्हणून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि युवा स्वाभिमान पार्टी एकत्र येत आहेत. मात्र जागा वाटप आणि युतीची अंतिम रूपरेषा ठरवण्याचे अंतिम वळण अजून बाकी आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये होणार्या बैठकीचे परिणाम महापालिकेच्या राजकीय नकाशावर मोठा प्रभाव टाकतील, असा अंदाज आहे.




