विज्ञानातून उजळले उद्याचे स्वप्न; अंजनगाव सुर्जीत तालुकास्तरीय विज्ञान महोत्सव

अंजनगाव सुर्जी / 22 डिसेंबर : येथे शैक्षणिक विश्वाला नवचैतन्य देणारा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी व स्नेहसंमेलनाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिक्षण विभाग पंचायत समिती अंजनगाव सुर्जी, अंजनगाव तालुका मुख्याध्यापक संघ, तालुका विज्ञान अध्यापक मंडळ तसेच बालशिवाजी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाने ज्ञान, कल्पकता आणि नवसर्जनशीलतेचा संगम अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाला आमदार गजानन लवटे, गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे, श्रीकृष्ण गोरडे आणि महेंद्र दिप्टे यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. मान्यवरांनी विज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असलेली जिज्ञासा, संशोधनवृत्ती आणि तंत्रज्ञानाशी नाळ जोडणारी दृष्टी यांचे विशेष कौतुक केले. विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगशील आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांनी उपस्थितांची मने जिंकली. पर्यावरण संरक्षण, ऊर्जा संवर्धन, दैनंदिन जीवनाशी निगडित तांत्रिक उपाय आणि सामाजिक प्रश्नांवरील वैज्ञानिक मांडणी यांमुळे प्रदर्शनीला विशेष रंगत आली. प्रत्येक प्रकल्पामागील विचारांची खोली आणि सादरीकरणातील आत्मविश्वास भविष्यातील सक्षम वैज्ञानिक घडत असल्याची जाणीव करून देणारा ठरला. या सोहळ्यास तालुक्यातील शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाला नवदिशा देणारा हा उपक्रम केवळ प्रदर्शनीपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करणारा ठरला, अशी भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती.




