विहिरीत युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

राजापेठ हद्दीतील पटेल नगर परिसरातील घटना, पोलिसांकडून तपास सुरु

अमरावती / 22 डिसेंबर – शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पटेल नगर परिसरात रविवारी दुपारी एका विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 21 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
विहिरीत मृतदेह दिसताच स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. तात्काळ पोलीस यंत्रणेला माहिती देण्यात आली. मृत युवकाची ओळख गोपाळ नगर येथील रहिवासी विशाल अशोक कबीर (वय 35) अशी करण्यात आली आहे. माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतील मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी पुढील तपासासाठी मृतदेह अमरावती येथील इर्विन शासकीय रुग्णा लयाच्या शवागारात पाठविला आहे. प्राथमिक चौकशीत विशाल कबीर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही. हा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button