मातोश्री वृद्धाश्रमात साकारणार गजानन महाराजांचे भव्य मंदीर
डॉ.सुभाष गवई यांच्या हस्ते भूमीपूजन, शेकडो नागरिकांची उपस्थिती

अमरावती /22 डिसेंबर : अमरावती मालखेड रोडवरील माळेगाव स्थित मातोश्री वृद्धाश्रमात प्रसिद्ध चित्रकार विजय राऊत यांच्या संकल्पनेतून अद्भूत असे संत गजानन महाराजांचे भव्य मंदिर साकारले जाणार आहे. या मंदिराचे भूमीपूजन संत बेंडोजी महाराज यांच्या उपस्थितीत विदर्भ महारोगी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सूभाष गवई यांच्या हस्ते कर्मयोगी संत गाडगे महाराज जयंतीच्या पर्वावर पार पडले. यावेळी कर्मयोगी संत गाडगे महाराज कल्याण संस्थेचे पदाधिकारी तसेच शेकडो नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मातोश्री वृद्धाश्रमाचे प्रणेते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सुखदेवराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा भूमीपूजन सोहळा थाटामाटात पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुभाष गवई, मनसे नेते राजू उंबरकर, प्रा.डॉ.दिनेश सूर्यवंशी, अमोल चवणे, वृद्धाश्रमाचे अध्यक्ष विजय राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथींचा सत्कार विजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. सुभाष गवई यांनी समाजातील कुटूंबव्यवस्था आणि वृद्धांच्या सामाजिक परिस्थिती बाबत चिंता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, वृद्धाश्रमांची या समाजाला गरज नसावी अशी आदर्श स्थिती आम्हाला अपेक्षित असून वास्तविकतेत मात्र वृद्धाश्रमांमध्ये वृद्धांची संख्या वाढते आहे. राऊत कुटूंबाने हे व्रत अंगीकारून आजवर या वृद्धांची सेवा केली असून माळेगाव परिसरात वसलेल्या या रुद्धाश्रमला त्या वानप्रस्थापनाचे स्वरूप प्राप्त करुन दिलेले आहे छोट्या छोट्या टेकड्यांमध्ये असलेल्या हा रुद्धाश्रम खोलाट नदीने वेढलेला असून सुंदर वनराईने नटलेला आहे त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. आज समाजात अनेक चांगले कार्य करणारे लोक असून संत गजानन महाराजांच्या आशिर्वादाने हे काम मोठे होत असून मला ते भूमीपूजन करण्याचा योग म्हणजे ईश्वरी संदेश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना राजू उंबरकर यांनी सुखदेवराव राऊत यांच्या आजवरच्या कामाबद्दल गौरवोद्गार काढून विजय राऊत यांनी वडिलांचा वारसा समर्थपणे ते चालवित असल्याचे ते म्हणाले. यासोबतच संत गजानन महाराजांच्या मंदिराच्या निर्मितीत जिथे कमतरता भासेल तिथे मी सर्वतोपरी सहकार्य करेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.दिनेश सूर्यवंशी यांनी कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्ताने प्रबोधनकार ठाकरे संस्थेद्वारा चालविण्यात येणार्या वृद्धाश्रमात संत गजानन महाराजांच्या मंदिराची पायाभरणी होत आहे की एक सामाजिक आणि दैवी बाब असल्याची भावना प्रकट केली. यावेळी त्यांनी सुर्यवंशी कुटूंबाकडून 51 हजारांची देणगी मंदिराच्या कार्यासाठी देण्याचे वचन देखील उपस्थितांसमोर दिले. सुखदेवराव राऊत यांनी अध्यक्षस्थानाहून बोलताना मातोश्री वृद्धाश्रमाचा आजवर खडतर प्रवास उपस्थितांसमोर मांडला. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून विजय राऊत यांनी वडिलांचा वारसा पुढे चालविण्यासाठी आमच्या पुढच्या पिढीने हे वृद्धाश्रम चालविण्याचे व्रत स्वीकारले असून आता पुढील पूर्णवेळ हा वृद्धाश्रमासाठी आपणे देणार असल्याचे सांगितले. तसेच वडिलांच्या संकल्पनेतून संत गजानन महाराजांचे भव्य दिव्य असे मंदिर इथे साकारल्या जाणार असून त्याची ख्याती दूरवर पोहोचेल असा मला विश्वास असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी राऊत कुटूंबातर्फे 5 लाखांची देणगी मंदिराच्या कार्यासाठी जाहिर केली. या कार्यक्रमाला शेकडो ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी महाप्रसादासह कार्यक्रमाची सांगता झाली.




