वलगावमध्ये गाडगेबाबांच्या विचारांचा जागर
स्वच्छतेने महानिर्वाण दिनी मानवंदना

अमरावती /22 डिसेंबर : राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या निर्वाणभूमी असलेल्या वलगावमध्ये 20 डीसेंबर रोजी विचारांचा एक अनोखा मेळा रंगला. ग्रामस्थांच्या उत्साहपूर्ण पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ’विचार मंथन’ कार्यक्रमाने गाडगे बाबांच्या विचारांना नवे बळ दिले. गावकर्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी करून दाखवला, ज्यामुळे गावातील वातावरण विचारांनी आणि प्रेरणेने भारले गेले.
राहूल गडपाले यांनी मुख्य वक्ते म्हणून गाडगे बाबा आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील गहन ऋणानुबंधावर अतिशय सविस्तर आणि मार्मिक भाष्य केले. गाडगे बाबांचे ग्रामस्वच्छता, समाजसुधारणा आणि नैतिकतेचे कार्य कसे बाबासाहेबांच्या समतेच्या विचारधारेने प्रेरित होते आणि त्यांनी एकमेकांना कशी पूरक साथ दिली, याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट चित्रण केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. प्रमुख अतिथी म्हणून अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांची उपस्थिती लाभली. त्यांनी ग्रामस्थांच्या या अभिनव उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. विशेष बाब म्हणजे, गावकर्यांनी गाडगे बाबांच्या पारंपरिक पालखी सोहळ्याची परंपरा बाजूला सारून त्याऐवजी गावातील रस्ते आणि परिसराची मोठ्या उत्साहाने सफाई केली होती. हा बदल पाहून महापात्र म्हणाल्या, आज आपल्याला ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करावे लागते मात्र, मात्र गाडगे बाबांना शतकापूर्वीच स्वच्छतेचे खरे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारी समजली होती. वलगावच्या ग्रामस्थांनी गाडगे बाबांच्या विचारांना खर्या अर्थाने जिवंत केले आहे. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांना प्रचंड प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष गाडगे महाराज मिशनचे सचिव श्री. सचिन राजारामबाप्पू घोंगटे यांनी गाडगे बाबांच्या जीवनातील अनेक प्रेरणादायी प्रसंग आणि त्यांच्या साध्या पण खणखणीत विचारांची ओळख करून दिली. ग्रामसुधार, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि स्वच्छता या विषयांवर गाडगे बाबांनी आयुष्य वेचले होते, याचे त्यांनी स्मरण करून दिले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी अत्यंत सुरेख आणि ओघवते केले. त्यांच्या संयोजनामुळे कार्यक्रमाला एक सलग आणि उत्साही वातावरण लाभले.वलगावचे ग्रामस्थ या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार होते. त्यांनी केवळ आयोजनच नव्हे, तर स्वतःच्या कृतीतून गाडगेबाबांच्या विचारांना अमलात आणले.




