सामाजिक बांधिलकी जोपासणारा उपक्रम
उमेद-पंख-विश्वासाचे उपक्रमाच्या दुसर्या दिवशी दिव्यांगाना जयपूर फुटचे वितरण

हेमंत काळमेघ यांचे प्रतिपादन
अमरावती/22 डिसेंबर : समाजामध्ये रुग्ण सेवेला अनन्य साधारण महत्व आहे. दिव्यांगांना केली जाणारी मदत ही ईश्वर चरणी अर्पण केलेली सेवा आहे. अश्या प्रकारचे उपक्रम सामाजिक बांधिलकी जोपासतात असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारीणी सदस्य हेमंत काळमेघ यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विशेष पुढाकारातून ’उमेद-पंख-विश्वासाचे’ या सामाजिक उद्देशाने दिव्यांग बांधवांसाठी निशुल्क जयपुर फुट वितरणाचा उपक्रम दिनांक 18 ते 27 डिसेंबर या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय अमरावती, इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोला, जयपुर फुट उपक्रमाचे प्रणेते आर्किटेक्ट रामेश्वर मणियार (पुणे) आणि दि अंबादास खोब्रागडे आर्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. निःशुल्क कृत्रिम अवयव वाटपाच्या आज दुस-या दिवशी एकुण 10 दिव्यांगांना जयपूर फुटचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रा. सुभाषराव बनसोड, अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मोहोड, इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोलाचे डॉ. किशोर मालोकार, जयपुर फुट उपक्रमाचे प्रणेते आर्किटेक्ट रामेश्वर मनियार, दि अंबादास खोब्रागडे आर्ट फाउंडेशनच्या अध्यक्ष आर्टिस्ट रजनी अंबादे, आकाश अंबादे, दानदाते दिपकजी चांडक, सौ. अनिताताई चांडक, प्रभजीत सिंह बच्छेर, मानद सचिव, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, अकोला, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोलाचे संचालक चंदूभाऊ खेडकर, उमेद-पंख-विश्वासाचे जयपूर फुट वितरण समन्वयक संदिप पुंडकर, माजी जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी, डॉ. विनीत कौर, कौन्सिलर, सायकोथेरेपिस्ट, यांची उपस्थिती होती. दानदाते दीपक जी चांडक यांनी या उपक्रमाबद्दल भरभरून कौतुक केले. समाजामध्ये अशा उपक्रमामुळे निराधारांना एक मायेचा आधार मिळतो.त्यांच्या जीवनात आशेचा किरण प्रज्वलित होतो. हे उपक्रम जीवनाला नवी दिशा देणारे ठरतात असे गौरव उद्गार असे त्यांनी काढले. अक्षय पाथ्रिकर, गौरव राऊत, राहुल लकडे यांच्यासह पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे या उपक्रमास विशेष सहकार्य लाभत आहे.




