पोलिस दलाचा श्वान; ‘नार्कोटीक्स एक्सपर्ट’ मार्शल’चे निधन
अंमली पदार्थ शोधण्यात होता तरबेज

अमरावती/21 डिसेंबर -शहर पोलिस दलात कार्यरत नऊ वर्षीय ‘नार्कोटीक्स एक्सपर्ट’ असलेल्या मार्शल नामक श्वानाचा शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी अचानक मृत्यू झाला. गांजासह, एमडी व अन्य अंमली पदार्थ शोधण्यात हा श्वान निष्णात होता. दरम्यान शनिवारी (दि. 20) शासकीय इतमामात मार्शल श्वानावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मार्शल सध्या नऊ वर्षाचा होता. ग्वाल्हेर येथून विशेष प्रशिक्षण घेऊन तो मागील आठ वर्षांपासून शहर पोलिस दलात कार्यरत होता. अमली पदार्थ शोधण्यात मार्शलची ख्याती होती. शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत मार्शल अतिशय सर्वसामान्य स्थितीत होता. सव्वातीन वाजताच्या सुमारास त्याने अचानक उलटी केली. त्यानंतर मार्शलचे मुख्य हँडलर पोलिस अंमलदार संदीप हटवार व सहकारी हँडलर नकुल जऊळकार यांनी त्याला तात्काळ येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्यावर चिकित्सकांनी उपचार केले. मार्शलवर उपचारानंतर त्याला बरे वाटेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळातच सव्वाचार वाजताच्या सुमारास हँडलर हटवार मार्शलला घेऊन परत येत असतानाच अचानक त्याची प्राणज्योत मालवली. पोटातील अंतर्गत दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मार्शल हा सध्या पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे त्याचे शवविच्छेदन करणे गरजेचे होते. त्यामुळे शनिवारी सकाळी पशुवैद्यकीय तज्ञांनी मार्शलचे विच्छेदन केले. त्यानंतर त्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ आदी उपस्थित होते. कारागृह, रेल्वेस्थानकावर कर्तव्यासाठी मार्शल अंमली पदार्थ शोधत होता. त्यामुळे अनेकदा त्याला घेऊन पोलीस रेल्वेस्टेशन, बसस्थानक तसेच संशयित ठिकाणी अमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी सोबत नेत होते. अमरावती शहराव्यतिरिक्त विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये त्याला कर्तव्यासाठी नेले जात होते. या सोबतच पोलिस कर्तव्य मेळाव्यासाठी तो पुणे, मुंबई आदी ठिकाणी गेला होता.




