अंजनगावमध्ये आज मतदान, उद्या निकाल
जिल्ह्यात 72 केंद्रांवर होणार मतदान

* दर्यापूर, वरुड आणि धारणी नगर पंचायतसाठीही आज मतदान
* अचलपूर- 9,527, दर्यापूर- 3,199, वरुड- 3,780 आणि धारणी- 1,619 मतदार
* 46 हजार 620 नागरिक ठरवतील नगराध्यक्ष व नगरसेवकांचे भवितव्य
अमरावती /19 डिसेंबर – अंजनगांव नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी आज शहरात मतदान रंगणार आहे. मतदान सकाळी 7.30 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5.30 वाजता संपेल. प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस, सुरक्षा रक्षक आणि केंद्रप्रमुख तैनात करून मतदानाची सुरक्षा सुनिश्चित केली आहे.
शहरातील 46,620 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यामध्ये महिला मतदार 22,697 असून, त्यांच्या सक्रिय सहभागामुळे निवडणुकीला वेगळा रंग आलेला आहे. नगराध्यक्ष पदासाठी सात दावेदार मैदानात आहेत. यामध्ये यश गजानन लवटे (शिवसेना उबाठा गट), अविनाश गायगोले (भाजप), स्पृहा अतुल डकरे (शिवसेना शिंदे गट), आएशाबानो (काँग्रेस), आकाश राऊत (अपक्ष), विनित डोंगरदिवे आणि सुनील जवंजाल हे प्रमुख आहेत. स्थानिक राजकीय विश्लेषक म्हणतात की, या दावेदारांमधील स्पर्धा खूपच कसोटीची ठरणार आहे. नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी 14 प्रभागांतून 173 उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे अंजनगांवमध्ये बहुकोणीय, आव्हानात्मक आणि रंगीत निवडणूक लढणार आहे.शहरात 52 मतदान केंद्रे स्थापन केली गेली आहेत. पुरुष मतदार 23,923 आणि महिला मतदार 22,697 आपला मतदान हक्क बजावणार आहेत. पोलिंग पार्टींनी मतदान साहित्य वितरण करून सर्व तयारी पूर्ण केली आहे. अंजनगांव व्यतिरिक्त अचलपुर, दर्यापुर, वरुड आणि धारणी नगर पंचायतसाठीही आज मतदान होणार आहे. अचलपुरमध्ये दोन, दर्यापुर आणि वरुडमध्ये प्रत्येकी एक, तर धारणीमध्ये दोन नगरसेवकांची निवड होणार आहे. जिल्ह्यात एकूण 72 मतदान केंद्र तयार असून 64,745 मतदार मतदान करतील.मतदारसंख्येची थोडक्यात माहिती अशी आहे: अचलपुरमध्ये 9,527, दर्यापुरमध्ये 3,199, वरुडमध्ये 3,780 आणि धारणीमध्ये 1,619 मतदार आपला मतदान हक्क बजावणार आहेत. प्रभागानुसार उमेदवारांची संख्या अशी आहे: अचलपुर 19-ब मध्ये 8, अचलपुर 10-अ मध्ये 9, वरुड 12-अ मध्ये 2, दर्यापुर 2-अ मध्ये 6, धारणी 14 मध्ये 4 आणि धारणी 16 मध्ये 2 उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. मतदानानंतर उद्या निकाल जाहीर होणार आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची निवड शहराच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे. स्थानिक राजकीय विश्लेषकांच्या मते, महिला मतदारांचा सहभाग, बहुकोणीय स्पर्धा आणि विविध राजकीय गटांची ताकद यामुळे आजचा निकाल रोमांचक राहण्याची शक्यता आहे. अंजनगांवमध्ये आज मतदानाचा अनुभव केवळ हक्क बजावण्यापुरता मर्यादित नसून, नागरिकांनी आपल्या शहराच्या भवितव्यासाठी सक्रिय सहभाग दर्शविला आहे.




