नागपूरसह राज्यात भाजप-शिवसेना महायुती मजबूत
29 महानगरपालिका भाजप-महायुती जिंकेल

* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास
नागपूर/16 डिसेंबर -राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप-महायुती विजयी होईल आणि अनेक ठिकाणी महायुतीचे महापौर असतील, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तसेच नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. 51 टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल, असा ठाम दावा त्यांनी केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महसूल खात्यात राबविण्यात आलेल्या व्यापक सुधारणा, महायुतीची भूमिका तसेच विरोधकांवर टीका याबाबत सविस्तर माहिती दिली.
महानगरपालिका निवडणुकांबाबत भूमिका-नागपूर असो वा मुंबई, जिथे भाजप मजबूत आहे तिथे भाजप आणि जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे शिवसेना निवडणूक लढवेल, असा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडसह इतर महानगरपालिकांमध्येही महायुतीतील चर्चा वेग घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युवा स्वाभिमान पक्ष आणि महायुती- युवा स्वाभिमान पक्ष गेल्या 15 वर्षांपासून महायुतीचा भाग असून, अमरावतीतही महायुतीतूनच निवडणूक लढवली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.विरोधकांवर जोरदार टीका-आदित्य ठाकरे यांच्या प्रमोशनबाबत प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी आपल्या मुलाला पुढे आणले होते, त्यामुळे यात नवीन काहीच नाही. तसेच संजय राऊत यांनी आयुष्यभर टीका करण्याचेच काम केले असून, त्यांना तेच दिसत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या आरोपांवर ते म्हणाले की, जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम निर्धार आहे.




