शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे आंतरराष्ट्रीय एआय परिषद

संशोधन, नवोन्मेष आणि समाजविकासाचा जागतिक संवाद

अमरावती /16 डिसेंबर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद खउ-खखडऊ’2025 चे दिनांक 19 व 20 डिसेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले असून ही परिषद कृत्रिम बुद्धिमत्ता या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रातील संशोधन, नवोन्मेष आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान यांचा सखोल आढावा घेणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. शुक्रवार, दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता परिषदेचे उद्घाटन होणार असून देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभणार आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, ऊर्जा, दळणवळण, सुरक्षा, स्मार्ट सिटीज आणि ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये एआयच्या उपयोगामुळे निर्माण होणार्‍या संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा यावर या परिषदेत सखोल चर्चा होणार आहे. विदर्भासारख्या शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होत असलेल्या विभागात अशा आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन होणे ही अत्यंत अभिमानाची बाब असून, यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना जागतिक दर्जाच्या संशोधनाशी थेट जोडले जाण्याची संधी मिळणार आहे. संशोधन व उद्योग यांमधील समन्वय वाढवून नव्या कल्पनांना चालना देणारा हा मंच ठरणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रकाशन भागीदार म्हणून ‘स्प्रिंगर नेचर’ (स्कोपस इनडेक्सड जर्नल) यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले असून, त्यामुळे सादर होणार्‍या संशोधन प्रबंधांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणार आहे. तांत्रिक भागीदार म्हणून एसीएम नागपूर प्रोफेशनल चॅप्टर, ज्ञान भागीदार म्हणून सॉफ्ट कम्प्युटिंग रिसर्च सोसायटी, नवी दिल्ली, तसेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नागपूर, टाटा मोटर्स नागपूर, इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल आणि स्टार्ट-अप समर्थन यांचे सहकार्य परिषदेला लाभले आहे. या सर्व भागीदारीमुळे परिषद अधिक दर्जेदार आणि परिणामकारक ठरणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांनी जास्तीत जास्त संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक आणि तरुण उद्योजकांनी परिषदेला उपस्थित राहून ज्ञानवृद्धीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच संशोधन प्रबंध सादर करणार्‍या सर्व संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांना त्यांनी शुभेच्छा देत, ही परिषद समाजोपयोगी संशोधन आणि नवोन्मेषाला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button