असदपूर येथील श्री गजानन महाराज मंदिरात पुन्हा चोरी
भाविकांत तीव्र संताप

अचलपूर /17 डिसेंबर : तालुक्यातील असदपूर येथील प्रसिध्द श्री गजानन महाराज मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील हजारो रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना 11 डिसेंबर रोजी रात्री घडली. विशेष म्हणजे, याच मंदिरात यापूर्वीही मोठी चोरी झाली असतानाच ही सलग दुसरी घटना घडल्याने गावात खळबळ उडाली असून भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. असदपूर येथील श्री गजानन महाराज मंदिर हे परिसरातील श्रद्धास्थान असून येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. काही महिन्यांपूर्वी पोळा सणाच्या काळात याच मंदिरातील दोन दानपेट्या फोडून लाखो रुपयांची चोरी करण्यात आली होती. त्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र आजतागायत आरोपींचा शोध लागलेला नाही, ही बाब ग्रामस्थ व भाविकांमध्ये नाराजीचे कारण ठरली आहे. अशातच 11 डिसेंबर रोजी रात्री पुन्हा एकदा चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीला लक्ष्य करत त्यामधील हजारो रुपयांची रक्कम चोरून नेल्याचे उघडकीस आले. सकाळी मंदिर उघडल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात येताच मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची तक्रार मंदिर पंचकमेटीने आसेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असली तरी अद्यापही चोरट्यांचा ठोस माग काढण्यात यश आलेले नाही. पहिल्या चोरीचा तपास प्रलंबित असतानाच पुन्हा चोरी झाल्यामुळे पोलीस तपासाबाबत ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. वारंवार मंदिरालाच लक्ष्य केले जात असताना सुरक्षा उपाययोजना अपुर्या ठरत असल्याचे मत नागरिक व भाविकांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तातडीने दखल घेऊन आरोपींना अटक करावी, तसेच मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी जोरदार मागणी श्री गजानन महाराजांचे भक्त व ग्रामस्थ करत आहेत. श्रद्धेच्या ठिकाणी वारंवार होणार्या चोर्यांमुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात असून लवकरात लवकर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.




