कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे दापोरी येथील नागरिक त्रस्त
कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या दापोरी -सालबर्डी- मोर्शी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे

मोर्शी /5 जून: मोर्शी तालुक्यातील दापोरी सालबर्डी रस्ता तीर्थक्षेत्र संत्रा प्रकीया उद्योगास जोडणार्या महत्वाच्या रस्त्याची सुधारणा करण्याकरिता हायब्रीड एन्यूटी प्रकल्पा अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले मात्र वेल्सपन इम्फ्रा प्रा.लि. कंपनी व संबंधित बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे या मार्गाचे काम 8 वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा दापोरी गावातील अपूर्ण कामे अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा पूर्ण करण्यास वेल्सपन इम्फ्रा प्रा.लि.कंपनी तयार नसल्यामुळे दापोरी गावामध्ये विविध प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहे. वेल्सपन इम्फ्रा प्रा.लि. कंपनीवर कार्यवाही करून 8 दिवसामध्ये अपूर्ण कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी दिला आहे.
मोर्शी तालुक्यातील दापोरी डोंगरयावली सालबर्डी पाळा मोर्शी रस्ता प्रजीमा 66 कि.मी. 0/00 ते 15/600 औधोगिक दृष्ट्या महत्वाच्या संत्राप्रकीया उद्योग व तिर्थक्षेत्रास जोडणार्या रस्त्याची सुधारणा करण्याकरीता हायब्रीड एन्यूटी प्रकल्पाअंतर्गत 1 डीसेंबर 2016 रोजी शासन निर्णय काढून प्रशासकीय मान्यता दिली.मात्र 8 वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा सदर रस्त्याचे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नसल्यामुळे दापोरी येथील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सदर रस्त्याचे काम वेल्सपन इम्फ्रा प्रा.लि. कंपनीणे घेतले असून दापोरी सालबर्डी रस्त्याच्या बाजूचे दापोरी येथील गावातील सांडपाणी वाहून नेण्याकरिता काँक्रिट नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून उर्वरित नालीचे बांधकाम अर्धवट सोडून दिल्यामुळे या मार्गावरील पावसाळ्यातील पाणी नागरिकांच्या घरात घुसून मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच रस्त्याच्या लगत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुद्धा कंपनीने केलेले नसल्यामुळे गावात जाणारे महत्वाचे रस्ते धोक्याचे झालेले आहे. जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय समोरील रस्त्याला लागून पेव्हर ब्लॉक बसविले नसल्यामुळे लहान विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथडा निर्माण झाला असून सदर रोडच्या बाजूला नाली अप्रोच रोडचे काम पूर्ण करण्यात आले नसल्यामुळे गावातील नागरिकांना गावामध्ये जाण्यास अडचण निर्माण होत असून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या गंभीर प्रकाराबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार वेल्सपन कंपनीला अनेक वेळा निवेदन देऊन कळविले होते.संबंधित कंत्राटदार यांनी तक्रारीला केराची टोपली दाखविल्यामुळे कंत्राटदाराच्या विरोधात रोष निर्माण होतांना दिसत आहे.